पालकांनो, ‘हा’ अभ्यासाचा प्लॅन वापरा – मुलं होतील यशस्वी आणि मोबाईलपासून दूर!
मुलांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे

महाराष्ट्र वाणी स्पेशल
दि१४ जुलै :- मुलांच्या यशस्वी भविष्यासाठी फक्त अभ्यासच नव्हे तर त्यांचे संपूर्ण दिनचर्याच योग्य पद्धतीने आखणं आवश्यक आहे. आजच्या तंत्रज्ञानाने भरलेल्या युगात मोबाईल, टीव्ही यांसारख्या गोष्टी मुलांना सहजपणे आकर्षित करतात. अशावेळी मुलांना योग्य मार्ग दाखवण्यासाठी आणि त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी पालकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे.
मोबाईलपासून मुलांना दूर ठेवण्यासाठी त्यांना दिवसभर व्यस्त ठेवणं आवश्यक आहे. त्यासाठी एक ठराविक वेळापत्रक तयार करा. मोबाईल आणि टीव्ही पाहण्यासाठी देखील वेळ ठरवा – मात्र ते नियंत्रित असावं.
🔹दिवसभराचं नियोजन असं असावं:
1. विश्रांतीचा वेळ ठरवा:
शाळेतून परतल्यावर मुलांना आराम आणि जेवणासाठी वेळ द्या. त्यांच्याशी संवाद साधा – मित्र, अभ्यास, शिक्षक याबद्दल बोला. त्यामुळे त्यांच्याशी असलेली आपली नाळ घट्ट होते.
2. छंदवर्गात सहभागी करा:
दुपारच्या जेवणानंतर मुलांना नृत्य, खेळ, संगीत, चित्रकला अशा छंद वर्गात सहभागी करा. यामुळे त्यांना त्यांच्या आवडी जपता येतील आणि आत्मविश्वास वाढेल.
3. नियमित अभ्यासाचा वेळ ठरवा:
छंदवर्गातून परतल्यावर, सायंकाळी अभ्यासासाठी निश्चित वेळ द्या. गृहपाठ, उजळणी, वर्गातील धडे यावर लक्ष केंद्रीत होईल आणि अभ्यासाचा ताण कमी होईल.
4. मर्यादित टीव्हीचा वेळ:
रात्री कुटुंबासोबत काही वेळ टीव्ही पाहण्याची मुभा द्या. यामुळे कौटुंबिक बंध अधिक मजबूत होतो आणि मुलांमध्ये समाधानाची भावना निर्माण होते.
5. पुरेशी झोप आवश्यक:
रात्री १० वाजेपर्यंत मुलांनी झोपले पाहिजे. पुरेशी झोप ही त्यांच्या मेंदूच्या आणि शरीराच्या विकासासाठी महत्त्वाची आहे. सकाळी वेळेवर उठण्यासाठी हीच सवय उपयुक्त ठरेल.
शेवटी महत्त्वाचं:
मुलं पालकांचे अनुकरण करतात. तुम्ही मोबाईल बाजूला ठेवून त्यांच्यासोबत वेळ घालवाल, संवाद साधाल तर तीच सवय त्यांच्यातही रुजेल. यशस्वी आणि शिस्तबद्ध मुलांसाठी हा छोटासा वेळापत्रक प्लॅन निश्चितच उपयुक्त ठरेल!
अशाच शैक्षणिक आणि पालकत्वविषयक माहितीकरिता जोडलेले राहा!