बनावट नंबर प्लेट लावलेली चोरीची स्कुटी जप्त; उच्चशिक्षित तर दुसरा सराईत चोर – जवाहरनगर बिट मार्शलची धडाकेबाज कारवाई
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ५ :- जवाहरनगर बिट मार्शल पथकाने बनावट नंबर प्लेट लावून विक्रीसाठी आणलेली चोरीची मोपेड स्कुटी जप्त करत दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. यामध्ये एक उच्चशिक्षित तर दुसरा चोरी, घरफोडी व शटरफोडीतील सराईत आरोपी असून, त्याच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
दि. 03 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 8.00 वाजता, बिट मार्शलचे पोलीस अमलदार मारोती गोरे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, शिवाजीनगर चौक, वाणी मंगल कार्यालयाजवळ दोन इसम चोरीची स्कुटी विक्रीसाठी येणार आहेत. ही माहिती तात्काळ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांना कळविण्यात आली. त्यांच्या आदेशाने पोउपनि रविकुमार गादेकर व बिट मार्शल पथकाने सापळा रचला.
थोड्याच वेळात संशयित इसम ग्रे रंगाच्या मोपेड स्कुटीवर येताना दिसले. पोलिसांनी थांबविण्याचा इशारा दिला असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाठलाग करून काही अंतरावर त्यांना पकडण्यात आले. स्कुटी क्रमांक MH-20-ES-1652 बाबत मूळ कागदपत्रांची विचारणा केली असता संशयास्पद उत्तरे दिल्याने त्यांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणण्यात आले.
चौकशीत आरोपींची नावे
प्रशांत परसराम शेळके (वय 32, शिक्षण – BE इंजिनिअरिंग, व्यवसाय – पेंटर, रा. देवळाई परिसर)
इम्तीयाज उर्फ पप्पी इसा खान (वय 24, व्यवसाय – मजुरी, रा. इंदिरानगर)
अशी निष्पन्न झाली.
स्कुटीच्या चेसिस क्रमांकाची तपासणी केली असता नंबर प्लेट व मूळ माहिती जुळत नसल्याचे आढळले. आरोपींनी घरच्या स्कुटीचा बनावट नंबर लावल्याची कबुली दिली. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन जवाहरनगर गु.र.नं. 3/2026, कलम 318(2), 318(4), 3(5) भा.न्या.संहिता (BNS) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून सुमारे 60,000 रुपये किंमतीची ग्रे रंगाची मोपेड स्कुटी जप्त करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपींनी सदर स्कुटी एक महिन्यापूर्वी मल्हार चौक, गारखेडा–पुंडलिकनगर परिसरातून चोरी केल्याची कबुली दिली. आरोपी क्रमांक 2 इम्तीयाज उर्फ पप्पी खान याच्यावर चोरी, घरफोडी, शटरफोडीचे गंभीर गुन्हे दाखल असून तो 15 दिवसांपूर्वी हर्सुल जेलमधून सुटला होता. संबंधित चोरीचा गुन्हा दाखल असलेल्या पोलीस स्टेशन पुंडलिकनगर (गु.र.नं. 476/2025, कलम 303(2) BNS) यांच्याकडे पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपी व मुद्देमाल वर्ग करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार, पोलीस उपआयुक्त प्रशांत स्वामी, सहाय्यक पोलीस आयुक्त मनिष कल्याणकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि रविकुमार गादेकर, पोअं. मारोती गोरे व सहा. फौजदार प्रल्हाद ठोंबरे यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.
— पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा गुन्हा उघडकीस, नागरिकांत समाधान