थंडीने झोंबायला सुरुवात! दिल्ली–राजस्थान–UP मध्ये रेड अलर्ट, महाराष्ट्रातही गारठा वाढणार
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ६ :- देशभरात हिवाळ्याने जोर पकडला असून अनेक राज्यांमध्ये तापमान मोठ्या प्रमाणात घसरत आहे. विशेषतः दिल्लीसह उत्तर भारतात कडाक्याची थंडी वाढली आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात थंडीची तीव्र लाट येत्या २४ तासांत आणखी तीव्र होणार आहे. रविवारी राजधानीत हाडं गोठवणारी थंडी पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये किमान तापमान सुमारे 3.9°C पर्यंत खाली येऊ शकते. त्यासोबतच दाट धुक्याची शक्यता कायम राहणार आहे.
दिल्लीसमोर दुहेरी संकट
राजधानी आधीच गंभीर वायूप्रदूषणाचा सामना करत असताना थंडीने दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. शहराचा AQI 333 वर पोहोचून हवा ‘अत्यंत खराब’ श्रेणीत नोंदवली गेली आहे. सकाळ-संध्याकाळ धुक्याचे प्रमाणही वाढत असून हवामानातील घसरण उद्यापासून अधिक जाणवणार आहे.
उत्तर प्रदेशात थंडीची लाट
उत्तर प्रदेशात हिवाळ्याची तीव्रता वाढत असून डिसेंबरच्या सुरुवातीला किमान तापमान 4°C नोंदवले गेले आहे. पुढील काही दिवस हे तापमान आणखी खाली जाण्याचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे.
राजस्थानातही तापमान घसरण
जयपूर, अजमेर आणि कोटा येथे रात्रीचे तापमान 10°C पर्यंत खाली आले आहे. येत्या काळात हे तापमान 5°C पर्यंत घसरू शकते. उत्तर भारतावरून जाणाऱ्या नवीन आणि कमकुवत पश्चिमी विक्षोभामुळे राजस्थानातील काही भागात थंडी वाढल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.
महाराष्ट्रातही गारठा वाढणार
पूर्व विदर्भातही थंडीने थैमान घातले आहे. नागपूर आणि गोंदिया येथे तापमान 9°C नोंदवले गेले आहे. ७ डिसेंबरला नागपूर, गोंदिया आणि यवतमाळ येथे शीतलहरीचा अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतर भागांमध्ये किमान तापमान 12–15°C दरम्यान राहण्याची शक्यता आहे.