निवडणूक खर्चाचा हिशोब 30 दिवसांत सादर करा – आयुक्त जी. श्रीकांत यांचे निर्देश
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि. १९ :- महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी त्यांच्या प्रचारासाठी झालेल्या एकूण खर्चाचा तपशील 30 दिवसांच्या आत निवडणूक आयोगाकडे सादर करणे अनिवार्य आहे. विहित मुदतीत खर्चाचा हिशोब सादर न केल्यास संबंधित सदस्याची सदस्यता रद्द होऊ शकते, असा इशारा महानगरपालिका आयुक्त जी. श्रीकांत यांनी दिला आहे.
छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक 2025–26 अंतर्गत दिनांक 15 जानेवारी रोजी मतदान प्रक्रिया पार पडली असून 16 जानेवारी रोजी निकाल जाहीर करण्यात आले. या निवडणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक उमेदवाराने निवडणूक प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील नियमानुसार सादर करणे बंधनकारक आहे.
या अनुषंगाने आज झालेल्या विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत आयुक्त जी. श्रीकांत यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. उमेदवारांना खर्चाचा हिशोब सादर करण्याबाबत वेळोवेळी सूचना देण्यात याव्यात तसेच नियमानुसार तपासणी व नोंद ठेवण्याची कार्यवाही काटेकोरपणे राबवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी आणि कायद्याचे काटेकोर पालन सुनिश्चित करण्यासाठी हा खर्चाचा हिशोब सादर करणे अत्यंत महत्त्वाचे असून सर्व निवडून आलेल्या सदस्यांनी याची गांभीर्याने दखल घ्यावी, असे आवाहनही आयुक्तांनी यावेळी केले.