हिंदू घरातून मुस्लिम अंत्ययात्रा; यावलमध्ये जिवंत राहिली माणुसकी

हिंदू घरातून मुस्लिम अंत्ययात्रा; यावलमध्ये जिवंत राहिली माणुसकी
हिंदू घरातून मुस्लिम अंत्ययात्रा; यावलमध्ये जिवंत राहिली माणुसकी

महाराष्ट्र वाणी 

यावल (प्रतिनिधी) दि ९ :- भारतीय संस्कृतीची खरी ओळख म्हणजे माणुसकी, आपुलकी आणि परस्पर आदर. या मूल्यांचा प्रत्यय यावल शहरात आलेल्या एका हृदयस्पर्शी घटनेतून पुन्हा एकदा आला आहे. धर्म, जात, पंथ या भिंती ओलांडून रक्ताच्या नात्यापेक्षा माणुसकीचे नाते किती श्रेष्ठ असते, हे या घटनेने अधोरेखित केले.

यावल येथील देवरे–सोनार कुटुंबाकडे कासमपूर खान ऊर्फ खान बाबा (वय १००) यांनी तब्बल सहा दशकांहून अधिक काळ सराफी कारागीर म्हणून प्रामाणिक सेवा बजावली. काळाच्या ओघात ते केवळ कामगार न राहता, त्या कुटुंबाचा अविभाज्य घटक बनले. वयोमानामुळे काम थांबल्यानंतरही देवरे–सोनार कुटुंबीयांनी त्यांची काळजी घेतली आणि त्यांना कधीही एकटं पडू दिलं नाही.

मंगळवारी वृद्धापकाळाने खान बाबा यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्यानंतरही देवरे–सोनार कुटुंबाने माणुसकीचा सर्वोच्च आदर्श जपत, खान बाबांची अंत्ययात्रा आपल्या घरातून निघावी अशी इच्छा व्यक्त केली. त्यानुसार मुस्लिम धार्मिक परंपरेनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले, मात्र हिंदू कुटुंबाच्या घरातून अंत्ययात्रा निघाल्याने संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले.

ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित न राहता, समाजासाठी राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक सलोखा आणि मानवतेचा ठळक संदेश देणारी ठरली आहे. आज धर्माच्या नावावर तणाव निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू असताना, यावलमधील हा प्रसंग माणुसकी अजूनही जिवंत आहे याची साक्ष देतो.

या घटनेबाबत नागरिकांनी भावना व्यक्त करताना सांगितले की,

“धर्म वेगळा असू शकतो, पण माणुसकीचं नातं असेल तर ते कधीच तुटत नाही.”

देवरे–सोनार कुटुंब आणि खान बाबा यांच्यातील हे अतूट नाते समाजासाठी प्रेरणादायी ठरत असून, यावल शहरातच नव्हे तर सर्वत्र त्याची प्रशंसा होत आहे.

धर्माच्या भिंती कोसळतात, तेव्हा माणुसकीचे नाते अधिक घट्ट होते.

यावलने पुन्हा एकदा सिद्ध केले—भारत अजूनही मानवतेवर उभा आहे.