‘एकही बालक लसीकरणाविना राहणार नाही’ — छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा विश्वसनीय उपक्रम
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि ४ :- महानगरपालिकेचे मा. आयुक्त श्री. जी. श्रीकांत यांच्या अध्यक्षतेखाली तसेच वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांच्या मार्गदर्शनानुसार आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. उज्वला भांबरे यांच्या समन्वयाने छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रत्येक बालकापर्यंत लसीकरणाच्या सुविधा प्रभावीपणे पोहोचाव्यात यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.
दि. 03/01/2026 रोजी महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील राजनगर आरोग्य केंद्रांतर्गत येणाऱ्या कासलीवाल झोपडपट्टी (बीड बायपास) या अतिजोखमीच्या परिसरात बालकांच्या नियमित लसीकरणाबाबत जनजागृती मोहीम आयोजित करण्यात आली. या मोहिमेद्वारे नागरिकांना लसीकरणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले तसेच मोफत आरोग्य तपासणी सेवाही देण्यात आली.
या उपक्रमांतर्गत एकूण 39 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात येऊन आवश्यक त्या औषधोपचारांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे झोपडपट्टी भागातील नागरिकांना शासकीय आरोग्य सेवा सुलभरीत्या उपलब्ध होऊन लसीकरणाबाबतची जाणीव व जागरूकता मोठ्या प्रमाणात वाढली आहे.
या कार्यक्रमात राजनगर आरोग्य केंद्राचे डॉ. श्रुती गिरी, इंचार्ज सिस्टर शर्मा, आयएफएम शिंदे, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, एमपीडब्ल्यू, आरसी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, मलेरिया विभागाचे कर्मचारी, रुग्णवाहीकेसह चालक आशीष झांबरे तसेच इतर आरोग्य कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले.
अमृत बालरुग्णालय येथील बालरोगतज्ञ डॉ. सुहास रोटे यांनी बालकांचे लसीकरण, पोषण व प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा याबाबत सविस्तर समुपदेशन केले. तसेच डॉ. मुंडे यांनी उपस्थित नागरिकांची आरोग्य तपासणी करून आवश्यक उपचार व सल्ला दिला.
या उपक्रमाचा मुख्य उद्देश लसीकरणाबाबत असलेले गैरसमज दूर करून लसीकरण नकार (Refusal) कमी करणे आणि शहरातील प्रत्येक बालक सुरक्षित ठेवणे हा आहे. नागरिकांनी सहकार्य करून आपल्या बालकांचे नियमित लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.