क्राईम शो पाहून रचला ‘परफेक्ट’ कट! जामडी फॉरेस्ट खुनाचा थरारक उलगडा – आई-मुलगा अटकेत

क्राईम शो पाहून रचला ‘परफेक्ट’ कट! जामडी फॉरेस्ट खुनाचा थरारक उलगडा – आई-मुलगा अटकेत
क्राईम शो पाहून रचला ‘परफेक्ट’ कट! जामडी फॉरेस्ट खुनाचा थरारक उलगडा – आई-मुलगा अटकेत

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २२ :- कन्नड तालुक्यातील जामडी फॉरेस्ट परिसरात सापडलेल्या अनोळखी मृतदेहामागील खुनाचा गुंता अखेर उलगडला असून, या थरारक प्रकरणात एका महिलेने आपल्या अल्पवयीन मुलासह खुनाची कबुली दिली आहे. खुनासाठी क्राईम शो, सिनेमा आणि ओटीटीवरील गुन्हेगारी मालिका पाहून अत्यंत नियोजनबद्ध कट रचल्याचे तपासात उघड झाले आहे.

या प्रकरणी वंदना राजू पवार (वय ४५) आणि धीरज उर्फ टेमा राजू पवार (वय १९, दोघे रा. जामडी फॉरेस्ट शिवार, ता. कन्नड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून, ही माहिती पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अपर पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह उपस्थित होत्या.

🔎 १३ जानेवारीचा खून, जंगलात मृतदेह

१३ जानेवारी रोजी जामडी फॉरेस्ट शिवारात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला होता. तपासात मृताची ओळख राजू रामचंद्र पवार (रा. जामडी, कन्नड) अशी पटली. घटनास्थळी मृताचे कपडे, चप्पल आणि फुटलेला मोबाईल सापडला होता. मात्र घनदाट जंगलामुळे तांत्रिक पुरावे मिळवणे पोलिसांसाठी मोठे आव्हान ठरले.

स्थानिक गुन्हे शाखा, कन्नड ग्रामीण पोलिस, डॉग स्क्वॉड आणि फॉरेन्सिक पथकाने तपास हाती घेत दोन विशेष पथके तयार करण्यात आली. जवळपास ६० ते ७० संशयितांची कसून चौकशी करण्यात आली.

⚠️ जबाबात विसंगती, संशय गडद

मृतदेह सापडलेल्या जागेजवळील शेताची देखभाल वंदना पवार व तिचा मुलगा धीरज करत असल्याची माहिती पुढे आली. चौकशीत दोघांच्या जबाबात विसंगती आढळून आल्याने पोलिसांचा संशय बळावला आणि अखेर दोघांना ताब्यात घेण्यात आले.

💔 अनैतिक संबंधासाठी दबाव, खुनाचा कट

पोलिस चौकशीत वंदना पवार हिने सांगितले की, मृत राजू पवार तिच्यावर वारंवार अनैतिक संबंधांसाठी दबाव टाकत होता. या त्रासाला कंटाळून तिने ही बाब मुलगा धीरजला सांगितली. त्यानंतर दोघांनी मिळून खुनाचा कट रचला.

१३ जानेवारी रोजी वंदनाने राजू पवारला शेताजवळ बोलावले. तो कपडे काढत असतानाच धीरजने लाकडी ओंडक्याने त्याच्या डोक्यावर व गुप्तांगावर जबर मारहाण केली. वंदनानेही त्याला साथ देत खून केला. पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह जंगलातील नाल्यात झाडाच्या मुळाशी पाण्यात अडकवून ठेवण्यात आला.

📱 क्राईम शोवरून ‘डिजिटल ट्रेल’ टाळण्याचे धडे

तपासादरम्यान धीरजच्या मोबाईलची छाननी केली असता, तो क्राईम पेट्रोल, सीआयडी, दृश्यम तसेच विविध ओटीटीवरील गुन्हेगारी मालिका पाहत असल्याचे निष्पन्न झाले. गुन्ह्यानंतर पुरावे राहू नयेत म्हणून सिमकार्ड बदलणे, मोबाईल फोडणे अशा क्लृप्त्यांचा वापर केल्याचेही समोर आले.

🚔 कन्नड पोलिसांच्या ताब्यात आरोपी

स्थानिक गुन्हे शाखेने दोन्ही आरोपींना अटक करून पुढील तपासासाठी कन्नड पोलिसांच्या हवाली केले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अपर अधीक्षक अन्नपूर्णा सिंह, सहायक अधीक्षक अपराजिता अग्निहोत्री, एलसीबी निरीक्षक विजयसिंग राजपूत यांच्यासह एलसीबी व कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाने केली.

👉 गुन्हा कितीही ‘परफेक्ट’ वाटला, तरी कायद्यापासून सुटका अशक्यच!