महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाला नवे मुख्य कार्यकारी अधिकारी; फैयाज अहमद खान यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २१ :- महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर श्री. फैयाज अहमद अब्दुल हमीद खान यांची प्रतिनियुक्तीने नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाने दिनांक २१ जानेवारी २०२६ रोजी शासन आदेश जारी केला आहे.
पनचक्की, छत्रपती संभाजीनगर येथील मुख्य कार्यकारी अधिकारी पद सद्यस्थितीत रिक्त असल्याने, उम्मीद अधिनियम १९९५ च्या कलम २३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून ही नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या सिडकोमध्ये महाव्यवस्थापक (गृहनिर्माण) म्हणून कार्यरत असलेले श्री. फैयाज अहमद खान यांची दोन वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीने या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
शासन निर्णयानुसार, श्री. खान यांनी ज्या दिवशी प्रतिनियुक्तीच्या पदाचा कार्यभार स्वीकारतील त्या दिवसापासून त्यांची सेवा सुरु होईल. लोकसेवेच्या हिताच्या दृष्टीने आवश्यक असल्यास, शासनास किंवा सक्षम प्राधिकाऱ्यास त्यांना मुदतपूर्व परत बोलावून घेण्याचा अधिकार राहणार आहे. तसेच, स्वीयेतर नियोक्त्याला आवश्यक नसल्यास त्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्याची मुभा देण्यात आली आहे.
या नियुक्तीमुळे महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
– अधिक तपशीलांसाठी आमच्यासोबत राहा.