फरफट बुलेटचा ‘कर्कश’ आवाज ठरला महाग! फुलंब्रीत मॉडिफाईड सायलेंसरवर पोलिसांचा दणका

फरफट बुलेटचा ‘कर्कश’ आवाज ठरला महाग! फुलंब्रीत मॉडिफाईड सायलेंसरवर पोलिसांचा दणका
फरफट बुलेटचा ‘कर्कश’ आवाज ठरला महाग! फुलंब्रीत मॉडिफाईड सायलेंसरवर पोलिसांचा दणका

महाराष्ट्र वाणी 

फुलंब्री दि २४ :- शहरातील शांतता भंग करणाऱ्या कर्णकर्कश सायलेंसरधारक दुचाकींवर अखेर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. फुलंब्री पोलिस ठाणे हद्दीत आज छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या वाहतूक शाखा व फुलंब्री पोलिसांनी संयुक्तपणे विशेष मोहीम राबवून फरफट आवाज करणाऱ्या बुलेट व इतर दुचाकींवर कारवाई केली.

या कारवाईत मोटारसायकलवर बेकायदेशीर व मॉडिफाईड सायलेंसर बसवून सार्वजनिक ठिकाणी कर्णकर्कश आवाज करणाऱ्या पाच दुचाकी चालकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.

ही संयुक्त कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पूजा नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

दिनांक 23 रोजी फुलंब्री बस स्थानकासमोर रस्त्यावर वाहतूक तपासणी दरम्यान नियमभंग करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली. सायलेंसरमधून होणारा मोठा आवाज नागरिकांसाठी त्रासदायक ठरत असल्याने, अशा वाहनांवर तात्काळ कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

👉 पोलिसांनी वाहनचालकांना स्पष्ट इशारा देत सांगितले की, बेकायदेशीर सायलेंसर, फॅन्सी नंबर प्लेट, ट्रिपल सीट, हेल्मेटविना वाहन चालविणे अशा प्रकारांवर यापुढेही कठोर कारवाई केली जाईल.

या धडक कारवाईमुळे शहरातील बेफिकीर दुचाकीस्वारांचे धाबे दणाणले असून, नागरिकांनीही पोलिसांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे.

🟡 कायदा पाळा, सुरक्षित रहा — अन्यथा ‘फरफट’चा आवाज थेट दंडात बदलेल!