२७ वर्षांच्या निष्ठेला पूर्णविराम! उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अॅड. हर्षवर्धन त्रिभुवन यांचा "जय महाराष्ट्र"
“स्वाभिमान महत्त्वाचा” – निष्ठावान शिवसैनिकाचा खणखणीत इशारा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) दि २५ :- बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत २७ वर्षे निष्ठेने काम केलेले, पक्षासाठी संघर्ष केलेले आणि संभाजीनगरमध्ये शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळख असलेले अॅड. हर्षवर्धन विजया आगंदा त्रिभुवन यांनी शिवसेना विभागप्रमुख, सोशल मीडिया समन्वयक पदासह शिवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत पक्ष नेतृत्वाला मोठा धक्का दिला आहे.
मा. शिवसेना पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांना पाठवलेल्या राजीनामा पत्रात अॅड. हर्षवर्धन त्रिभुवन यांनी आपल्या २७ वर्षांच्या राजकीय प्रवासाची भावनिक आठवण करून देत, आज निष्ठावान शिवसैनिकांवर होत असलेल्या अन्यायाकडे स्पष्टपणे बोट दाखवले आहे.
✒️ “उद्धव साहेब मुख्यमंत्री झाल्यावरच क्लीन शेव्ह करेल” – २००५ ची प्रतिज्ञा
राजीनामा पत्रात त्यांनी नमूद केले की,
२००५ साली शिवसेनेचा सर्वात युवा उमेदवार म्हणून त्यांनी अशा वॉर्डमधून निवडणूक लढवली जिथे शिवसेनेचा उमेदवार उभा राहत नव्हता. त्या काळात छत्रपती संभाजीनगरच्या विराट सभेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः माझे नाव घेतले, हा क्षण आयुष्यभर अभिमानाने मिरवेन, असे त्यांनी नमूद केले.
👥 आदित्य ठाकरे यांच्याशी जवळीक
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे संभाजीनगर दौऱ्यावर आले की आवर्जून भेट घ्यायचे, पक्षातील कामकाजाबाबत चौकशी करायचे, हेही त्यांनी स्पष्ट केले. मात्र, असे असूनही आज पक्षात निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलले जात आहे, ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
⚠️ “शेवटी स्वाभिमान महत्त्वाचा”
“पक्षासाठी आयुष्य घालवलेल्या शिवसैनिकांवर अन्याय होत असेल, तर पद आणि पक्ष दोन्ही निरर्थक ठरतात. शेवटी स्वाभिमान महत्त्वाचा,” अशा ठाम शब्दांत त्यांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले.
🚨 पक्षातील गळतीवर गंभीर सवाल
विशेष म्हणजे, उद्या युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत असतानाच आज त्यांच्या विश्वासू शिलेदाराने पक्षाला ‘जय महाराष्ट्र’ केला आहे.
आतापर्यंत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील अनेक पदाधिकारी भाजप व शिंदे गटात गेले असून ही गळती थांबत नसल्याबाबत त्यांनी थेट वरिष्ठ नेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
❓ पुढील राजकीय भूमिका काय?
महाराष्ट्र वाणीच्या प्रतिनिधींनी पुढील राजकीय वाटचालीबाबत विचारले असता, अॅड. हर्षवर्धन त्रिभुवन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले,
“सध्या कोणत्याही पक्षात जाणार नाही. पुढे काय होते ते पाहू.”
या राजीनाम्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात खळबळ उडाली असून, शिवसेनेतील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा उघडपणे समोर आली आहे.
निष्ठा, संघर्ष आणि स्वाभिमानाची किंमत न कळल्यास, इतिहास घडवणारेच कार्यकर्ते पक्षापासून दूर जातात – हर्षवर्धन त्रिभुवन यांचा राजीनामा हीच खंत व्यक्त करतो!