NMMS परीक्षेसाठी सरदार एस. के. पवार विद्यालयात मार्गदर्शन शिबिर व सराव परीक्षा संपन्न
महाराष्ट्र वाणी
नगरदेवळा (ता. पाचोरा) दि २८ :- येथील सरदार एस. के. पवार माध्यमिक विद्यालयात इयत्ता ८वीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती (NMMS) परीक्षेच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन शिबिर व सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले. उर्दू व मराठी विभागातील विद्यार्थ्यांसाठी मागील वर्षभरापासून या परीक्षेची विशेष तयारी करून घेण्यात येत असून, २८ डिसेंबर २०२५ रोजी होणाऱ्या परीक्षेच्या अनुषंगाने हा उपक्रम राबवण्यात आला.
या वेळी मार्गदर्शन करताना सादीक शेख सर यांनी “अभ्यासात सातत्य, योग्य नियोजन, जिद्द आणि अथक परिश्रम यांच्या बळावर कोणतीही परीक्षा आत्मविश्वासाने देता येते,” असा कानमंत्र विद्यार्थ्यांना दिला. विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष सराव परीक्षा घेण्यात आली असून परीक्षेची तयारी अधिक भक्कम करण्यावर भर देण्यात आला.
जाकीर अली सर, इकबाल शेख सर, अफरोज शेख सर, जहांगीर शेख सर, मोहसीन सर यांनीही विद्यार्थ्यांना उपयुक्त मार्गदर्शन केले. ग्राम शिक्षण समिती संचलित नगरदेवळा संस्थेचे मानद सचिव बापूसाहेब शिवनारायणजी जाधव यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक किरण काटकर सर, उपमुख्याध्यापक व सर्व शिक्षकवृंद यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
उर्दू विभागातील शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा समन्वयक सादीक शेख सर तसेच मराठी विभागातील NMMS परीक्षा समन्वयक निखिल शिरुडे सर यांनी विशेष वर्गांचे आयोजन करून विद्यार्थ्यांसाठी वैयक्तिक मार्गदर्शन केले. या उपक्रमासाठी उर्दू व मराठी विभागातील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.
शिष्यवृत्तीच्या दिशेने विद्यार्थ्यांची वाटचाल अधिक भक्कम करणारा हा उपक्रम प्रेरणादायी ठरला आहे.