इकरा महाविद्यालयाच्या दानिश खानची आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड; जळगावचा खेळाडू गुजरातमध्ये चमकणार

इकरा महाविद्यालयाच्या दानिश खानची आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड; जळगावचा खेळाडू गुजरातमध्ये चमकणार
इकरा महाविद्यालयाच्या दानिश खानची आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड; जळगावचा खेळाडू गुजरातमध्ये चमकणार

महाराष्ट्र वाणी 

जळगाव, दि. १ :- इकरा शिक्षण संस्था संचलित एच. जे. थीम कला व विज्ञान महाविद्यालय, मेहरून (जळगाव) येथील होतकरू विद्यार्थी दानिश खान जावेद खान यांची आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड झाली असून, ही स्पर्धा परुल विद्यापीठ, गुजरात येथे पार पडणार आहे. दानिश खान यांची निवड कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या फुटबॉल संघामध्ये करण्यात आली आहे.

ही प्रतिष्ठित आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धा दि. ३ जानेवारी ते ९ जानेवारी २०२६ या कालावधीत होणार असून, देशभरातील विविध विद्यापीठांचे संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या निवडीमुळे इकरा महाविद्यालयासह जळगाव जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दानिश खान यांच्या या यशाबद्दल इकरा शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार, एजाज मलिक, अमीनबाई बादलीवाला, अब्दुल रशीद शेख, अब्दुल अजीज सालार, अब्दुल मजीद शेठ जकरिया तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सदस्यांनी त्यांचे मनापासून अभिनंदन केले आहे.

या यशामागे महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य तथा क्रीडा संचालक डॉ. चांदखान यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच उपप्राचार्य डॉ. वकार, उपप्राचार्य डॉ. तनवीर खान यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी दानिश खान यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

दानिश खान यांच्या निवडीमुळे इकरा महाविद्यालयातील खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून, भविष्यात तो विद्यापीठासह राज्य व राष्ट्रीय स्तरावर उत्तम कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

इकरा महाविद्यालयाचा हा खेळाडू आता जळगावचा नावलौकिक राष्ट्रीय स्तरावर नेणार, यात शंका नाही!