❓ काचेची, स्टीलची, तांब्याची की प्लास्टिकची? पाणी पिण्यासाठी कोणती बाटली आहे सर्वात सुरक्षित? जाणून घ्या सत्य
महाराष्ट्र वाणी विशेष
आजच्या धावपळीच्या जीवनात पाण्याची बाटली ही आपल्या दैनंदिन गरजेचा अविभाज्य भाग बनली आहे. जिम, ऑफिस, प्रवास किंवा घर—सर्वत्र आपण बाटलीचा वापर करतो. मात्र, बाटली खरेदी करताना तिचा रंग, डिझाइन किंवा कॅरी करण्याची सोय पाहिली जाते; पण ती आरोग्यासाठी सुरक्षित आहे की नाही, याकडे अनेकदा दुर्लक्ष होते.
तज्ञांच्या मते, चुकीच्या मटेरियलची बाटली वापरल्यास पाण्यातून हानिकारक घटक शरीरात जाऊ शकतात. त्यामुळे काचेची, स्टीलची, तांब्याची आणि प्लास्टिकची—या चारही प्रकारच्या बाटल्यांपैकी नेमकी कोणती बाटली आरोग्यासाठी योग्य आहे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.
🔹 काचेची बाटली
काचेच्या बाटल्या पाण्याची नैसर्गिक चव कायम ठेवतात. त्यातून कोणतीही रासायनिक द्रव्ये पाण्यात मिसळत नाहीत. काचेला छिद्र नसल्यामुळे बॅक्टेरिया चिकटण्याची शक्यता कमी असते आणि स्वच्छ करणेही सोपे जाते.
तज्ज्ञांच्या मते, BPA-मुक्त असल्यामुळे काचेची बाटली आरोग्यासाठी सुरक्षित मानली जाते. मात्र, ती निसरडी व फुटण्याचा धोका असल्याने मजबूत कव्हर असलेली बाटली निवडणे आवश्यक आहे.
🔹 स्टीलची बाटली
स्टेनलेस स्टीलच्या बाटल्या टिकाऊ, हलक्या आणि दीर्घकाळ पाणी थंड किंवा गरम ठेवण्यास उपयुक्त असतात. त्या विषारी नसून मायक्रोप्लास्टिकपासून मुक्त असतात.
तथापि, कमी दर्जाच्या स्टीलच्या बाटल्या योग्यरीत्या स्वच्छ न केल्यास पाण्याला धातूचा वास किंवा चव येऊ शकते. तरीही, दर्जेदार स्टीलची बाटली दैनंदिन वापरासाठी उत्तम पर्याय मानली जाते.
🔹 तांब्याची बाटली
आयुर्वेदानुसार तांबे हे नैसर्गिक अँटीमायक्रोबियल घटक असून ते पाण्यातील जंतू नष्ट करण्यास मदत करते. पचन सुधारण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास तांब्याच्या पाण्याचा उपयोग होतो.
मात्र, तांब्याच्या बाटलीत पाणी जास्त काळ साठवणे किंवा आम्लयुक्त पेये ठेवणे धोकादायक ठरू शकते. जास्त प्रमाणात तांबे शरीरात गेल्यास लिव्हर व किडनीवर दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशारा तज्ज्ञ देतात.
🔹 प्लास्टिकची बाटली
प्लास्टिकच्या बाटल्या सर्वाधिक वापरात असल्या तरी त्या आरोग्यासाठी सर्वात धोकादायक ठरू शकतात. त्यातून BPAसारखी रसायने पाण्यात मिसळू शकतात, जी शरीरात प्रवेश करून कर्करोग, हार्मोनल असंतुलन आणि हृदयरोगाचा धोका वाढवू शकतात.
संशोधनानुसार, प्लास्टिकच्या बाटल्या बॅक्टेरिया वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण करतात. त्यामुळे शक्यतो प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर टाळण्याचा सल्ला दिला जातो.
✅ निष्कर्ष
आरोग्याच्या दृष्टीने विचार करता काच आणि दर्जेदार स्टीलच्या बाटल्या हा सर्वात सुरक्षित पर्याय ठरतो. तांब्याची बाटली मर्यादित वापरासाठी उपयुक्त आहे, तर प्लास्टिकच्या बाटल्यांचा वापर शक्य तितका कमी करणेच हितावह ठरेल.
आरोग्य टिकवायचं असेल, तर पाणी शुद्ध असणं जितकं महत्त्वाचं आहे, तितकीच महत्त्वाची आहे त्यासाठी वापरली जाणारी बाटली!