ऐन जिल्हा परिषद निवडणुकीत ठाकरे गटाला मोठा धक्का! ग्रामीण जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड शिंदेंच्या शिवसेनेत, मुलीचा तात्काळ अर्ज
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर( औरंगाबाद) दि २१ :- जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांची आघाडी आकार घेत असतानाच ठाकरे गटाला ग्रामीण भागात जोरदार धक्का बसला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रामीण जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड यांनी पक्षाला रामराम ठोकत थेट एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे, या राजकीय हालचालीसोबतच त्यांच्या कन्या मोनाली राठोड यांनी सोयगाव तालुक्यातील आमखेडा जिल्हा परिषद सर्कलमधून शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
हा सगळा प्रकार ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर घडल्याने ठाकरे गटात अस्वस्थता निर्माण झाली असून, या धक्क्याचे केंद्र सिल्लोड आणि आमदार अब्दुल सत्तार यांच्याभोवती फिरत आहे. राजेंद्र राठोड यांच्याकडे कन्नड, सिल्लोड आणि सोयगाव या तीन विधानसभा मतदारसंघांची ग्रामीण जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. इतकेच नव्हे तर, अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली जाहीर झालेल्या संभाजीनगर–जालना जिल्हा परिषद समन्वय समितीतही त्यांची निवड करण्यात आली होती.
समितीत निवड होऊन अवघे २४ तास उलटत नाहीत, तोच राठोड यांनी जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा देत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सिल्लोड–सोयगावचे आमदार व माजी मंत्री अब्दुल सत्तार आणि राजेंद्र राठोड यांचे जुने व घनिष्ठ संबंध संपूर्ण तालुक्याला परिचित आहेत. गेल्यावर्षी झालेल्या सोयगाव बाजार समिती निवडणुकीतही या संबंधांचा प्रत्यय आला होता. त्या निवडणुकीत ठाकरे गट आणि शिंदे गटाची युती होऊन राजेंद्र राठोड अध्यक्षपदी निवडून आले होते.
राजेंद्र राठोड यांची कन्या मोनाली राठोड या मागील जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेकडून सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. त्यावेळी त्यांना समाजकल्याण सभापतीपदाची जबाबदारीही देण्यात आली होती. शिवसेनेत फूट पडल्यानंतरही राठोड यांनी काही काळ उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी स्वबळावर लढण्याची भूमिका घेतल्याने राजकीय समीकरणे बदलली.
ठाकरे गटाची मर्यादित ताकद लक्षात घेता, कन्येला पुन्हा जिल्हा परिषदेत संधी मिळावी यासाठी अखेर राजेंद्र राठोड यांनी पक्ष बदलण्याचा निर्णायक निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे. आज त्यांनी आपल्या जिल्हाप्रमुख पदासह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि काही तासांतच त्यांची कन्या मोनाली राठोड हिने आमखेडा सर्कलमधून शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला.
जिल्हा परिषद निवडणुकीचा मुहूर्त साधत राजेंद्र राठोड यांनी जुने राजकीय संबंध जपले आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आमदार अब्दुल सत्तार यांना अपेक्षित असलेली भूमिका घेतल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
जिल्हा परिषद रणधुमाळीत हा राजकीय भूकंप पुढील समीकरणे कशी बदलतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.