जिल्हा परिषद उर्दू शाळा नगरदेवळा येथे “सरहदो के मुहाफिज” कार्यक्रमाचे आयोजन
महाराष्ट्र वाणी
पाचोरा(प्रतिनिधी) दि २६ :- जिल्हा परिषद उर्दू शाळा, नगरदेवळा येथे शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या देशसेवेत कार्यरत असलेले वसीम ताज खान (भारतीय सैन्य) आणि अरबाज शेख लतीफ (सशस्त्र सीमा बल – SSB) यांच्या उपस्थितीत “सरहदो के मुहाफिज” या विशेष सत्कार व मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात कुराण पठण व नात-ए-पाकने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गरीब नवाज फाउंडेशनचे अध्यक्ष शेख अफरोज रहीम होते.
यावेळी वसीम ताज खान यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “माणसाची खरी किंमत ही शिक्षणामुळेच वाढते. अशिक्षित व्यक्ती समाजावर ओझे ठरते.” त्यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच शिस्त, परिश्रम व देशसेवेचे महत्त्व पटवून देत भारतीय सैन्यात भरती होण्यासाठी प्रेरित केले.
अरबाज शेख लतीफ यांनी आपल्या जीवनातील संघर्ष, यशाचा प्रवास तसेच भूदल, नौदल, वायुदल व NDA परीक्षेबाबत सविस्तर माहिती दिली. शाळेतील सकारात्मक शैक्षणिक वातावरण आणि दर्जेदार शिक्षणाबद्दल त्यांनी शिक्षकांचे विशेष कौतुक केले.
सुट्टीवर असतानाही विद्यार्थ्यांसाठी वेळ काढून मार्गदर्शन केल्याबद्दल अध्यक्षीय भाषणात शेख अफरोज रहीम यांनी दोन्ही जवानांचे आभार मानले.
या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य सय्यद इमरान अली, मुश्ताक ताज खान, नासिर मणियार, लतीफ शेख, अब्दुल करीम शेख, सोहेल शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक अजहर शेख, जावेद रहीम, शेख रिजवान, दिलारा सय्यद, सना अंसारी व नवीदा अंसारी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शेख जावेद रहीम यांनी केले तर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांच्या प्रेरणेतून नगरदेवळ्याच्या शाळेत देशभक्तीचा नवा अंकुर फुलला.