"पाच दिवस समुद्राशी झुंज... आणि शेवटी माणुसकीने वाचवले प्राण!"

"पाच दिवस समुद्राशी झुंज... आणि शेवटी माणुसकीने वाचवले प्राण!"
"पाच दिवस समुद्राशी झुंज... आणि शेवटी माणुसकीने वाचवले प्राण!"

महाराष्ट्र वाणी - विशेष 

पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात राहणारे रवींद्रनाथ नावाचे एक मच्छीमार काही दिवसांपूर्वी आपल्या १५ सहकाऱ्यांसह मासेमारीसाठी बंगालच्या उपसागरात हल्दिया जवळ गेले होते. मात्र अचानक हवामान बिघडले, प्रचंड वादळ उठले आणि त्यांचे ट्रॉलर उलटून गेलं. क्षणातच सर्वजण लाटांमध्ये हरवले... त्यात रवींद्रनाथही.

पण रवींद्रनाथ खचला नाही. समुद्र हीच त्याची कर्मभूमी होती. तो पोहत राहिला... दिवसरात्र अथांग सागरात. त्याच्याकडे ना अन्न होतं, ना पिण्याचं पाणी. जेव्हा आकाशातून पाऊस पडायचा, तेव्हाच थोडं पाणी मिळायचं. पाच दिवस, ६०० किमी अंतर... आणि तरीही त्याने जगण्याची आशा सोडली नाही.

पाचव्या दिवशी बांगलादेशजवळील कुतुबदिया बेटाजवळून जात असलेल्या ‘एमव्ही जवाद’ या जहाजाच्या कॅप्टनने दूरवर हालचाल पाहिली. नीट पाहिलं तर एक माणूस पाण्यात तरंगताना दिसत होता. त्यांनी तात्काळ मदतीसाठी लाइफ जॅकेट फेकलं, जे प्रथम प्रयत्नात पोहोचले नाही. पण कॅप्टनने हार मानली नाही. पुन्हा प्रयत्न केला, आणि यावेळी रवींद्रनाथने ते पकडलं.

त्याला क्रेनच्या साहाय्याने जहाजावर वर आणलं गेलं — अर्धमेला, थकलेला, पण जिवंत. जहाजावरील सर्व खलाशांनी टाळ्या वाजवत त्या क्षणाचा आनंद साजरा केला. त्यांनी फक्त एक माणूस वाचवला नाही, तर माणुसकी जिवंत ठेवल्याचा संदेश दिला.

या विलक्षण प्रसंगाचा व्हिडिओ जहाजावरील एका खलाशाने रेकॉर्ड केला आणि तो आजही प्रत्येक पाहणाऱ्याच्या काळजात घर करून जातो.

 त्या जहाजावरील प्रत्येक खलाशाचे, त्या कॅप्टनचे आभार — तुमच्या कृतीमुळे आज संपूर्ण जगाला आठवण झाली आहे की माणुसकी अजूनही शिल्लक आहे.

एकाने दिलेली झुंज आणि दुसऱ्याने दाखवलेली करुणा — हाच खरा माणुसकीचा विजय!