रेलगावच्या विकासाला गती; सरकारी विहीर परिसराचा कायापालट
महाराष्ट्र वाणी
सिल्लोड/ रेलगाव दि २० :- गावातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली सरकारी विहीर (आड) परिसरातील अस्वच्छतेची समस्या अखेर मार्गी लागली आहे. सरपंच पंकज जैस्वाल यांच्या प्रयत्नातून या परिसरातील साचलेली घाण व सांडपाणी साफ करून स्वच्छता करण्यात आली असून, नागरिकांच्या सोयीसाठी सिमेंट काँक्रीटचा मजबूत रस्ता तयार करण्यात आला आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून या परिसरात मोठ्या प्रमाणात घाण आणि सांडपाणी साचत असल्याने नागरिकांना दुर्गंधी, डासांचा प्रादुर्भाव आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात ही समस्या अधिक गंभीर होत होती.
ही परिस्थिती लक्षात घेऊन परिसराची साफसफाई करून तेथे काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला. त्यामुळे वर्षानुवर्षे अस्वच्छतेच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
सरपंच पंकज जैस्वाल यांच्या प्रयत्नातून झालेल्या या कामामुळे परिसराचे स्वरूप बदलले असून, नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. गावाचा विकास केवळ घोषणांमधून नव्हे, तर प्रत्यक्ष कामातून दिसून येतो, अशी भावना ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.
गावातील मूलभूत समस्या दूर करून स्वच्छ, सुरक्षित आणि सुविधायुक्त वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने हे काम महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.