हजरत जर जारी जर बक्ष (र.अ.) यांच्या ७४० व्या उरूसपूर्वी पोलीस प्रशासनाची दर्गाह परिसराची पाहणी
महाराष्ट्र वाणी
खुलताबाद दि २५ :- हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दीन जर जारी जर बक्ष (र.अ.) यांच्या ७४० व्या वार्षिक उरूस मुबारक तसेच आगामी ईद-ए-मिलादुन्नबी (स.)च्या पार्श्वभूमीवर खुलताबाद शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी पोलीस प्रशासनाने सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली.
ग्रामीण पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी अपरिजीता अग्निहोत्री आणि उपविभागीय अधिकारी (एसडीओ) संतोष गरुड यांनी खुलताबाद येथील हजरत ख्वाजा शेख मुंतजबोद्दीन जर जारी जर बक्ष (र.अ.) यांच्या दर्ग्यासह विविध धार्मिक स्थळांना भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. उरूस काळात भाविकांची मोठ्या प्रमाणावर होणारी गर्दी लक्षात घेऊन पोलीस बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, प्रवेश व निर्गमन मार्ग, तसेच आपत्कालीन उपाययोजनांची तपासणी करण्यात आली.
यावेळी दर्गाह कमिटीच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव व उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांचे शाल व फेटा बांधून स्वागत व सत्कार केला. प्रशासन आणि दर्गाह कमिटी यांच्या समन्वयातून उरूस आणि ईद-ए-मिलादुन्नबीचा उत्सव शांततापूर्ण, सुरक्षित आणि भक्तिमय वातावरणात पार पडावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.