“तुकाराम मुंडेंच्या कारवाईला फडणवीसांचा ‘ग्रीन सिग्नल’; मिलावटखोरांवर धडक मोहीम सुरूच!”

“तुकाराम मुंडेंच्या कारवाईला फडणवीसांचा ‘ग्रीन सिग्नल’; मिलावटखोरांवर धडक मोहीम सुरूच!”
“तुकाराम मुंडेंच्या कारवाईला फडणवीसांचा ‘ग्रीन सिग्नल’; मिलावटखोरांवर धडक मोहीम सुरूच!”

महाराष्ट्र वाणी

मुंबई दि १९ :- महाराष्ट्रात अन्नपदार्थांमधील भेसळ आणि खाद्य सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (FDA) सुरू केलेल्या धडक कारवाईला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाम पाठिंबा दर्शवला आहे. “जनतेच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही,” असा स्पष्ट संदेश देत त्यांनी ही कारवाई पुढेही सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले.

FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरात विविध खाद्य आस्थापनांवर तपासणी आणि कारवाईचा वेग वाढला आहे. मोठी रेस्टॉरंट्स, क्लब, कॅफे, फास्ट-फूड साखळ्या, आईस्क्रीम पार्लर तसेच ऑनलाइन डिलिव्हरीशी संबंधित गोदामांचीही तपासणी करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या काही आस्थापनांवर परवाना निलंबन आणि माल जप्त करण्यासारखी कारवाई करण्यात आली.

शाहरुख, अजय देवगण, टायगर श्रॉफ यांनाही नोटीस

प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाल्याच्या कथित सरोगेट जाहिरातींच्या प्रकरणात अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना FDA कडून कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ‘विमल इलायची’च्या जाहिरातीच्या संदर्भात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

या प्रकरणी संबंधित अभिनेत्यांना निर्धारित मुदतीत स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे. खाद्य सुरक्षा आणि जाहिरात नियमांच्या अनुषंगाने FDAकडून पुढील कारवाई केली जाण्याची शक्यता आहे.

“कारवाई उशिरा झाली, पण आता नियमांनुसार पावले”

तुकाराम मुंडे यांनी खाद्य सुरक्षा कायदे आणि जाहिरात नियमांच्या अंमलबजावणीचा संदर्भ देत अशा प्रकरणांमध्ये यापूर्वीच कारवाई होणे अपेक्षित होते, अशी भूमिका मांडली आहे. आता नियमांनुसार आवश्यक ती कठोर कारवाई केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुंडेंच्या भूमिकेवर न्यायालयाचीही टिप्पणी

FDAच्या आक्रमक कारवाईमुळे व्यावसायिक क्षेत्रातही चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, बॉम्बे हायकोर्टातील एका सुनावणीदरम्यान मुंडे यांच्या कारवाईच्या पद्धतीवर न्यायालयाकडून “मच्छर मारण्यासाठी तलवार वापरू नका” अशा आशयाची मौखिक टिप्पणी करण्यात आल्याचे समोर आले होते.

मात्र, दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जनतेच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कठोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचे स्पष्ट करत FDAच्या कारवाईला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आगामी काळातही राज्यातील खाद्य आस्थापनांवरील तपासणी आणि कारवाईची मोहीम आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.