माणुसकीचा आदर्श! वडिलांनी स्वतःची किडनी देत मुलाला दिले जीवनदान

माणुसकीचा आदर्श! वडिलांनी स्वतःची किडनी देत मुलाला दिले जीवनदान
माणुसकीचा आदर्श! वडिलांनी स्वतःची किडनी देत मुलाला दिले जीवनदान

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड (प्रतिनिधि) दि १९ :- बाभूळगाव येथील पुंडलिक गोडसे यांनी आपल्या मुलासाठी घेतलेला निर्णय आणि केलेला त्याग समाजासाठी माणुसकीचा आदर्श ठरला आहे. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेल्या मुलाला वाचवण्यासाठी वडिलांनी स्वतःची एक किडनी दान करून त्याला जीवनदान दिले.

बाभूळगाव, ता. सिल्लोड येथील संकेत पुंडलिक गोडसे गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने त्रस्त होते. डॉक्टरांनी त्यांची किडनी निकामी झाल्याचे सांगितल्यानंतर कुटुंबीयांसमोर मोठे संकट उभे राहिले. मात्र, मुलाचे प्राण वाचवण्यासाठी वडील पुंडलिक बंडू गोडसे यांनी स्वतःची एक किडनी दान करण्याचा निर्णय घेतला.

आमदार अब्दुल सत्तार यांचे जुने सहकारी असलेल्या पुंडलिक गोडसे यांच्या परिवाराशी अनेक वर्षांपासून जिव्हाळ्याचे ऋणानुबंध आहेत. संकेतच्या आजारपणाच्या काळात यापूर्वीही त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन प्रकृतीची विचारपूस करण्यात आली होती. नुकतीच पुन्हा संकेत आणि पुंडलिक गोडसे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली.

वडिलांनी मुलासाठी केलेला हा त्याग केवळ रक्ताच्या नात्याची ताकद दाखवणारा नाही, तर माणुसकी आणि प्रेमाची सर्वोच्च भावना अधोरेखित करणारा आहे.

सध्या संकेत आणि पुंडलिक गोडसे या दोघांचीही प्रकृती ठणठणीत असून त्यांना उत्तम आरोग्य लाभावे आणि त्यांची पुढील वाटचाल सुखमय व्हावी, अशी मनःपूर्वक सदिच्छा व्यक्त करण्यात आली.