रोशन गेटमध्ये विजेच्या तारांचा जीवघेणा गुंता; वारंवार वीज गुल, महावितरणच्या कारभारावर संताप!
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) :- रोशन गेट प्रभाग क्रमांक १३
रोशन गेट परिसरातील करीम कॉलनी, मकसूद कॉलनी, पिली कॉलनी आणि युनूस कॉलनी भागात वारंवार वीज खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. विद्युत तारा बदलल्यानंतरही ट्रान्सफॉर्मर फेल होणे, तारा जळणे आणि अचानक वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच आहेत.
करीम कॉलनी परिसरात आज विद्युत खांबावरील अनेक करंटच्या तारा जळून खाक झाल्याची घटना घडली. त्यामुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली. विशेष म्हणजे या ठिकाणी नागरिकांसह लहान मुलांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे जळलेल्या आणि अस्ताव्यस्त तारांमुळे गंभीर दुर्घटनेचा धोका निर्माण झाला आहे.
विद्युत खांबांवर Wi-Fi केबल्सचा विळखा!
रोशन गेट परिसरातील अनेक विद्युत खांबांवर इंटरनेट आणि Wi-Fi कंपन्यांच्या केबलचे मोठमोठे गुंडाळे दिसून येतात. त्यामुळे या केबल्सना महावितरणची परवानगी किंवा आवश्यक NOC आहे का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
अनधिकृतपणे केबल टाकण्यात आल्या असतील, तर संबंधित कंपन्यांवर महावितरण आणि महानगरपालिका कारवाई करणार का? असा प्रश्नही नागरिकांकडून विचारला जात आहे.
दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासन जागे होणार का?
विद्युत खांबांवरील जळलेल्या तारा आणि बेताल पद्धतीने टाकलेल्या केबलमुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे महावितरण आणि छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने संयुक्तपणे परिसरातील विद्युत खांबांची तपासणी करून धोकादायक तारा व अनधिकृत केबल हटवाव्यात, तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“मोठी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल रोशन गेटमधील नागरिक उपस्थित करत आहेत.