कष्ट करणाऱ्या सहावीतील आर्यनला मदतीचा हात; अंबादास दानवेंकडून सायकल भेट
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ९ :- घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही शिक्षणाची कास न सोडता कुटुंबाला हातभार लावणाऱ्या नागसेननगर येथील सहावीतील विद्यार्थी आर्यन गौतम गायकवाड याच्या जिद्दीची आणि संघर्षाची दखल शिवसेना नेते तथा माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते आमदार अंबादास दानवे यांनी घेतली.
आर्यन हा भागीरथीबाई उच्च माध्यमिक शाळा, पीर बाजार, उस्मानपुरा येथे इयत्ता सहावीमध्ये शिक्षण घेत आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत प्रतिकूल असून त्याची आई घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. अशा परिस्थितीत आर्यनही लहान वयातच कुटुंबाच्या मदतीसाठी पुढे आला आहे.
पाऊस असो, थंडी असो किंवा कडक ऊन... आर्यन दररोज वृत्तपत्र विक्रीचे काम करतो. सकाळी वृत्तपत्र वाटप करून मिळणाऱ्या उत्पन्नातून तो आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावतो आणि त्याचबरोबर नियमितपणे शाळेत जाऊन शिक्षणही घेत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षण आणि कुटुंबाची जबाबदारी अशा दोन्ही आघाड्यांवर त्याची सुरू असलेली धडपड कौतुकास्पद आहे.
आर्यन हा मातृभूमी प्रतिष्ठान, क्रांती चौक येथील कार्यालयात सातत्याने वृत्तपत्र देण्यासाठी येत असतो. त्याची मेहनत, जिद्द आणि संघर्ष आमदार अंबादास दानवे यांच्या लक्षात आला. एवढ्याशा वयात कुटुंबासाठी कष्ट करणाऱ्या आर्यनला प्रोत्साहन देण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
आर्यनचा दररोजचा प्रवास अधिक सुकर व्हावा, वृत्तपत्र वाटपासाठी लागणारा वेळ आणि श्रम कमी व्हावेत तसेच त्याला शिक्षणासाठी अधिक वेळ देता यावा, या उद्देशाने अंबादास दानवे यांनी आज आर्यनला सायकल भेट दिली.
या मदतीमुळे आर्यनच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. आर्थिक अडचणींवर मात करत शिक्षणाची वाटचाल करणाऱ्या या चिमुकल्याच्या जिद्दीला मिळालेली ही साथ त्याच्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे.
आर्यनची जिद्द सांगतेय—परिस्थिती कितीही कठीण असली, तरी मेहनत आणि शिक्षणाची साथ सोडायची नाही!