"घाटीत मोठे बदल! बायोमेट्रीक हजेरी सक्तीची; निवासी डॉक्टरांना ८ तासांचीच ड्युटी"

कॉलेज कौन्सिलच्या बैठकीत महत्त्वाचे निर्णय; वेतन, रिक्त पदे आणि आरोग्य सेवांबाबतही मोठे निर्णय

"घाटीत मोठे बदल! बायोमेट्रीक हजेरी सक्तीची; निवासी डॉक्टरांना ८ तासांचीच ड्युटी"
"घाटीत मोठे बदल! बायोमेट्रीक हजेरी सक्तीची; निवासी डॉक्टरांना ८ तासांचीच ड्युटी"

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ३ :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे प्रशासन आणि आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. शुक्रवार (दि.३) रोजी शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या सभागृहात पार पडलेल्या महाविद्यालयीन परिषदेच्या बैठकीत बायोमेट्रीक हजेरीपासून निवासी डॉक्टरांच्या ड्युटी वेळांपर्यंत अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर शिक्कामोर्तब करण्यात आले.

बैठकीत वर्ग-३ कर्मचारी आणि नर्सिंग स्टाफसाठी बायोमेट्रीक हजेरी सक्तीची करण्यात आली. तसेच निवासी डॉक्टरांचे वेतन प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपूर्वी देणे बंधनकारक करण्यात आले आहे. निवासी डॉक्टरांना केवळ ८ तासांचीच ड्युटी देण्यात यावी, असा निर्णय घेत प्रत्येक विभागाला त्याचे वेळापत्रक तयार करून एका आठवड्यात अधिष्ठाता कार्यालयात सादर करण्याचे निर्देश देण्यात आले.

याशिवाय राज्य कर्करोग रुग्णालयातील विविध रिक्त पदे भरण्यासाठी कार्यवाही करण्यास मान्यता देण्यात आली. स्थानिक स्तरावर भरता येणाऱ्या पदांबाबतही चर्चा करण्यात आली. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेची कामे पूर्ण करण्यासाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याचे आदेश देण्यात आले.

रुग्णालयातील सर्व व्हेंटिलेटरचा आढावा घेऊन ते शंभर टक्के कार्यान्वित करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच राज्य कर्करोग रुग्णालयातील किरणोपचार विभागातील यंत्रसामुग्री दुरुस्तीसाठी ५५ लाख रुपये तर ग्रंथालयासाठी २० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला.

पेटस्कॅन तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षक डॉ. दर्पण जक्कल यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, त्यांच्या शिफारशीनुसार विभागाकडून आलेल्या रुग्णांची पेटस्कॅन तपासणी केली जाणार आहे.

दरम्यान, सर्व डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर कर्तव्यावर हजर राहावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या. सकाळी १०.३० वाजेपर्यंत ड्युटीवर उपस्थित न राहिल्यास संबंधितांकडून लेखी खुलासा मागविण्यात येणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

या बैठकीस अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड, उपअधिष्ठाता डॉ. काशिनाथ गर्कळ यांच्यासह विविध विभागप्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

घाटीतील प्रशासनिक शिस्त आणि आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी उचललेले हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.