मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी गुफरान शब्बीर अन्सारी; फाजीलभाई अन्सारी यांच्याकडे कार्याध्यक्षपद
महाराष्ट्र वाणी
मुंबई दि १७ :- ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी जालन्याचे गुफरान शब्बीर अन्सारी यांच्यावर सोपवण्यात आली आहे. तर भिवंडीचे फाजीलभाई अन्सारी यांची कार्याध्यक्षपदी एकमताने निवड करण्यात आली. मुंबईतील मुसाफिर खाना येथे 16 ऑगस्ट रोजी झालेल्या संघटनेच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
संघटनेचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या निधनानंतर राष्ट्रीय अध्यक्षपद रिक्त होते. मागील काही महिन्यांपासून संघटनेचे कामकाजही काही प्रमाणात ठप्प होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत लोकशाही पद्धतीने नव्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली.
गुफरान शब्बीर अन्सारी आणि फाजीलभाई अन्सारी यांच्या निवडीचे उपस्थित पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यावेळी नाशिक जिल्हाध्यक्ष फारुख बागवान, अॅड. अन्सार सय्यद, मनमाडचे फिरोज शेख, सद्दाम आत्तार आणि मतीन मन्सुरी आदींच्या हस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
बैठकीदरम्यान महाराष्ट्र अध्यक्ष मुसामुर्शद, प्रवक्ते मिर्झा अब्दुल कय्युम नदवी , मुंबईचे सईद खान, अमीर इद्रीशी, खुर्शीद सिद्दीकी, सरफराज अर्जु आणि निजामुद्दीन राहील यांनी संघटनेच्या पुढील वाटचालीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी दिवंगत शब्बीर अन्सारी यांच्या सामाजिक कार्याचाही उपस्थितांनी गौरवाने उल्लेख केला. मुस्लिम ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी त्यांनी दीर्घकाळ काम केले. जात प्रमाणपत्र, जात पडताळणी तसेच ओबीसी समाजाच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी आंदोलने आणि पाठपुरावा केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांच्या कार्यामुळे अनेक विद्यार्थी, कर्मचारी आणि राजकीय-सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींना विविध संधी मिळाल्याचा दावा यावेळी करण्यात आला.
बैठकीला महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. छत्रपती संभाजीनगरचे मिर्झा अब्दुल कलाम, परभणीचे सय्यद फारूक, रत्नागिरीचे कमालुद्दीन अहमद कांडेकर, बीडचे शेख जाकीर महबूब, रफिक भाई, नांदेडचे रिजवान कुरेशी, बीडचे इमरान कुरेशी, सांगोल्याचे निहाल जहांगीर तांबोळी, लातूरच्या औशाचे डॉ. वाहिद कुरेशी, पुण्याचे जब्बार शेख, सांगलीचे शहानवाज सौदागर, साताऱ्याचे निसारजी मुल्ला, दहिवडीचे मुंशी अहमद सय्यद, चिखलीचे इब्राहिम बारूदवाला, अहमदपूरचे कलीमुद्दीन अहमद यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सभेचे सूत्रसंचालन इसाक खडगे यांनी केले. नव्या नेतृत्वाच्या माध्यमातून संघटनेचे कामकाज पुन्हा सक्रिय करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.