भोकरदनमध्ये अन्न विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६१.५६ लाखांचा गुटखा-पान मसाला व वाहन जप्त!

भोकरदनमध्ये अन्न विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६१.५६ लाखांचा गुटखा-पान मसाला व वाहन जप्त!
भोकरदनमध्ये अन्न विभागाचा ‘सर्जिकल स्ट्राईक’; ६१.५६ लाखांचा गुटखा-पान मसाला व वाहन जप्त!

महाराष्ट्र वाणी

जालना दि १३ :- ‘Safe Food, Safe Maharashtra’ मोहिमेंतर्गत जालना जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई करत प्रतिबंधित गुटखा व पान मसाल्याचा तब्बल ३६ लाख ५६ हजार २५० रुपयांचा साठा जप्त केला. हा साठा वाहून नेण्यासाठी वापरण्यात आलेले सुमारे २५ लाख रुपये किमतीचे वाहनही जप्त करण्यात आले. या कारवाईत एकूण ६१ लाख ५६ हजार २५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.

अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे १२ ऑगस्ट २०२६ रोजी भोकरदन येथे ही धडक कारवाई करण्यात आली. मानवी आरोग्यास घातक ठरणाऱ्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री व वाहतूक केल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात विद्याराम श्यामलाल कश्यप (रा. निन्वया, दौलताबाद, आग्रा, उत्तर प्रदेश), फिरोज खान महमूद खान (रा. भोकरदन, जि. जालना) तसेच संबंधित Supplier कंपनीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.

भोकरदन पोलीस ठाण्यात FIR क्रमांक ४५९/२०२६, दिनांक १२ ऑगस्ट २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील कलम ५९ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ही धडक कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी विनोद के. ओसवार यांनी केली. छत्रपती संभाजीनगरचे सहआयुक्त श्रीकांत आर. करकळे आणि जालना येथील सहाय्यक आयुक्त एन. एस. कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली.

प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाची मोहीम यापुढेही अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.