जर जरी बक्ष उरूसासाठी प्रशासन सज्ज; भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

खुलताबाद येथील उरूस यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा; वाहतूक, सुरक्षा, आरोग्य आणि स्वच्छतेवर विशेष भर

जर जरी बक्ष उरूसासाठी प्रशासन सज्ज; भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करा – जिल्हाधिकारी विनय गौडा
जर जरी बक्ष उरूसासाठी प्रशासन सज्ज; भाविकांना सर्व सुविधा उपलब्ध करा – जिल्हाधिकारी विनय गौडा

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १७ :- खुलताबाद येथील हजरत ख्वाजा जर जरी बक्ष उरूस यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने पूर्वतयारीला वेग दिला आहे. उरूसासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना आरोग्य, पिण्याचे पाणी, वीज, एसटी बस सेवा, स्वच्छतागृहे आणि इतर आवश्यक सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी संबंधित विभागांना दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत उरूसाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, उपविभागीय अधिकारी संतोष गोरड, तहसीलदार संतोष गुट्टे, मुख्याधिकारी समीर शेख, नगराध्यक्ष अमीर पटेल, दर्गा समितीचे अध्यक्ष इजाज अहमद, उपाध्यक्ष इमरान जहागिरदार, सदस्य सचिव कामरान अहमद यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकारी गौडा यांनी भाविकांच्या सोयीसाठी निधीची कमतरता भासू नये, याची विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले. वाहनतळ, राहटपाळणे आणि इतर मनोरंजनाच्या साधनांमुळे गर्दीची समस्या निर्माण होऊ नये, यासाठी योग्य नियोजन करण्यावर त्यांनी भर दिला.

यंदा उरूस आणि श्रावण महिना एकाच कालावधीत येत असल्याने वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ अपेक्षित आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन आणि प्रादेशिक परिवहन विभागाने वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष नियोजन करावे. तसेच खुलताबाद शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढवून सुरक्षा अधिक बळकट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

उरूस काळात तहसील कार्यालय, आरोग्य विभाग, अन्न व औषध प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, महावितरण, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि खुलताबाद नगरपालिकेने परस्पर समन्वयाने काम करून यात्रा सुरक्षित, सुव्यवस्थित आणि निर्विघ्न पार पाडावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.