15 दिवसांनंतर उलगडला गूढ खून! कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह प्रकरणात रिक्षाचालकाला गुन्हे शाखेकडून अटक

15 दिवसांनंतर उलगडला गूढ खून! कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह प्रकरणात रिक्षाचालकाला गुन्हे शाखेकडून अटक
15 दिवसांनंतर उलगडला गूढ खून! कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह प्रकरणात रिक्षाचालकाला गुन्हे शाखेकडून अटक

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २६ :- एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याच्या हद्दीत गांधेली फाटा परिसरात झाडाझुडपात कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या अज्ञात मृतदेहाच्या गूढ खुनाचा उलगडा शहर गुन्हे शाखेने केला आहे. या प्रकरणी रिक्षाचालक शेख अनीस शेख अनिव (वय 26, रा. जुलेखा नगर, देवळाई) याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून सुमारे ₹1.10 लाखांचा मुद्देमाल, ज्यामध्ये एक ऑटो रिक्षा आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 जुलै 2026 रोजी गांधेली फाटा परिसरात झाडाझुडपात गोरख अर्जुन राऊत (वय 35, रा. गेवराई, जि. बीड) यांचा नग्न व कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली; मात्र शवविच्छेदन अहवालात डोक्याला गंभीर मार लागल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 447/2026, कलम 103(1) भारतीय न्याय संहिता अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

तपासादरम्यान गुन्हे शाखेने देवळाई चौक ते झाल्टा फाटा परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली, तसेच गुप्त माहितीदारांच्या मदतीने माहिती गोळा केली. त्यातून आरोपी शेख अनीस याची ओळख पटली.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, 12 जुलै रोजी आरोपीने झाल्टा फाटा परिसरातून गोरख राऊत यांना आपल्या रिक्षामध्ये बसवून शहरातील विविध भागात फिरवले. त्यानंतर दोघांनी देशी दारू खरेदी करून गांधेली फाटा परिसरातील झाडाझुडपात जाऊन मद्यप्राशन केले. यावेळी वैयक्तिक कारणावरून झालेल्या वादातून आरोपीने दगडाने डोक्यावर वार करून गोरख राऊत यांची हत्या केली आणि घटनास्थळावरून रिक्षासह पसार झाला.

विशेष म्हणजे आरोपी आणि मृतक यांची पूर्वी कोणतीही ओळख नव्हती. कोणताही ठोस धागादोरा नसताना सातत्यपूर्ण तपास, तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हे शाखेने या खुनाचा उलगडा करण्यात यश मिळवले.

ही कारवाई पोलीस आयुक्त प्रविण पवार, पोलीस उपायुक्त (गुन्हे) शशिकांत सातव, सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद आणि प्रभारी सहायक पोलीस आयुक्त नरेंद्र पाडळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने केली.