जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांना गती द्या; जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांना गती द्या; जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.
जलयुक्त शिवार अभियान २.० च्या कामांना गती द्या; जलसंधारणाची कामे वेळेत पूर्ण करा – जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ६ :- जिल्ह्यात जलयुक्त शिवार अभियान २.० अंतर्गत सुरू असलेली मृद व जलसंधारणाची कामे नियोजित वेळेत पूर्ण करून प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी दिले. नाला खोलीकरणासह विविध जलसंधारण प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी तालुकास्तरीय यंत्रणांनी समन्वयाने काम करावे, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम., उपवनसंरक्षक सुवर्णा माने, जिल्हा जलसंधारण अधिकारी नरेंद्र कटके, कपिल बिडकर, वरिष्ठ भूवैज्ञानिक जीवन बेडवाल यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी प्रत्यक्ष आणि दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.०, गाळमुक्त धरण–गाळयुक्त शिवार अभियान, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) २.०, 'कॅच द रेन' अभियान आणि असेट मॅपिंग अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विविध विभागांकडून राबविण्यात येणाऱ्या जलसंधारण उपाययोजनांच्या प्रगतीचे परीक्षण करून आवश्यक सूचना देण्यात आल्या.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी नाला खोलीकरणाच्या कामांना विशेष प्राधान्य देण्याचे निर्देश दिले. आगामी पावसाळ्यात जास्तीत जास्त जलसंचय होण्यासाठी सर्व कामे दर्जेदार आणि निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला.

तसेच 'कॅच द रेन' पोर्टलवरील माहिती वेळेत अद्ययावत करणे, असेट मॅपिंगची कामे पूर्ण करणे आणि जलयुक्त शिवार अभियान २.० ची उद्दिष्टे वेळेत साध्य करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले.