शहरात बनावट तूप-पनीर रॅकेटचा पर्दाफाश! ३.१२ लाखांचा साठा जप्त; डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित

शहरात बनावट तूप-पनीर रॅकेटचा पर्दाफाश! ३.१२ लाखांचा साठा जप्त; डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित
शहरात बनावट तूप-पनीर रॅकेटचा पर्दाफाश! ३.१२ लाखांचा साठा जप्त; डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि ३१ :- 'सेफ फूड, सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने छत्रपती संभाजीनगर शहरात भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत एमआयडीसी चिकलठाणा येथील एका डेअरी उत्पादन युनिटवर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ३ लाख १२ हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून संबंधित डेअरीचा परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे एमआयडीसी चिकलठाणा परिसरातील सर्व्हिस इंडस्ट्री प्लॉट क्रमांक सी-४५ येथे असलेल्या अमोल दूध डेअरीवर धाड टाकण्यात आली. तपासादरम्यान डेअरीमध्ये मोठ्या प्रमाणात नॉन-फूड ग्रेड सोयाबीन तेलाचा साठा आढळून आला. हे तेल कथितरीत्या पनीर आणि गाईचे तूप तयार करण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

कारवाईदरम्यान अधिकाऱ्यांनी डेअरीमधून एकूण ९५० किलो वजनाचा साठा जप्त केला. यात २९९ किलो तूप, १९९ किलो साय, १७४ किलो पनीर आणि २७८ किलो रिफाइंड सोयाबीन तेलाचा समावेश आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल

तूप : २९९ किलो – किंमत ₹१,६७,४४०

साय (क्रीम) : १९९ किलो – किंमत ₹५५,७२०

पनीर : १७४ किलो – किंमत ₹४५,२४०

रिफाइंड सोयाबीन तेल : २७८ किलो – किंमत ₹४४,४८०

तपासादरम्यान संबंधित डेअरीकडून शहरातील लक्ष्मी डेअरीच्या टीव्ही सेंटर, कामगार चौक आणि दर्गा रोडवरील श्रीराम चौक येथील तीन विक्री केंद्रांना पनीर आणि तुपाचा पुरवठा केला जात असल्याचे उघड झाले. त्यानंतर अन्न सुरक्षा विभागाने या तीनही दुकानांवर धडक कारवाई करत गाईच्या तुपाचे नमुने तपासणीसाठी घेतले आणि ४१ किलो तूप (किंमत ₹२९,३००) जप्त केले.

या गंभीर प्रकाराची दखल घेत प्रशासनाने संबंधित उत्पादन युनिटचा परवाना तात्काळ निलंबित करून आस्थापना बंद केली आहे. पुढील तपास आणि प्रयोगशाळेच्या अहवालानंतर संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

ही कारवाई अन्न सुरक्षा अधिकारी वर्षा रोडे, कीर्तिका झाडे, प्रदन्या सुरसे, फरीद सिद्दीकी आणि योगेश चिभाडे यांनी सहायक आयुक्त दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली. तसेच संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली.

"सेफ फूड, सेफ महाराष्ट्र" मोहिमेमुळे भेसळखोरांवर मोठा आघात झाला असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांविरोधात प्रशासनाचा दणका कायम राहणार आहे.