पुण्यात लवकरच प्रोटॉन थेरपी; कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा, परवडणाऱ्या दरात उपचारांची सुविधा

पुण्यात लवकरच प्रोटॉन थेरपी; कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा, परवडणाऱ्या दरात उपचारांची सुविधा

महाराष्ट्र वाणी

पुणे दि १७ :- कर्करोगाच्या उपचारासाठी अत्याधुनिक मानली जाणारी प्रोटॉन थेरपी आता पुण्यातही उपलब्ध होण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. शासन आणि रुबी हॉल क्लिनिक यांच्या सहकार्याने ही सुविधा सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू आहे. सध्या महाराष्ट्रात ही सुविधा मर्यादित ठिकाणी उपलब्ध असल्याने पुण्यातील प्रकल्पामुळे राज्यातील रुग्णांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.

गरजू रुग्णांना अत्याधुनिक उपचार कमी खर्चात मिळावेत, यासाठी आरोग्य विभाग आणि रुबी हॉल क्लिनिकच्या प्रतिनिधींमध्ये मंत्रालयात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कर्करोग तसेच हृदयरोगावरील उपचार अधिक सुलभ करण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णयांवर चर्चा करण्यात आली.

महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजना यांच्या माध्यमातून अंगीकृत रुग्णालयांमध्ये हृदयरोग आणि कर्करोगावरील उपचारांसाठी पात्र रुग्णांना मोफत किंवा सवलतीच्या दरात सुविधा देण्याच्या उपाययोजनांवरही निर्णय घेण्यात आला.

अवयव प्रत्यारोपणासारख्या खर्चिक उपचारांमध्ये शासकीय योजनेतील आर्थिक मर्यादा अपुरी ठरल्यास, अतिरिक्त खर्च भागविण्यासाठी विशेष शासकीय कॉर्पस फंडाचा उपयोग करण्याची तरतूद करण्याबाबतही चर्चा झाली. यामुळे गरजू रुग्णांना आर्थिक मदत मिळण्यासोबतच अवयवदान आणि प्रत्यारोपणाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गोवा आणि कर्नाटक सीमाभागातील ग्रामीण रुग्णांना महागड्या तपासण्यांसाठी वारंवार पुणे किंवा मुंबई गाठावी लागू नये, यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील गारगोटी येथे अत्याधुनिक डायग्नोस्टिक सेंटर उभारण्याचा प्रस्ताव आहे. रुबी हॉलच्या माध्यमातून हे केंद्र माफक दरात सेवा देण्यासाठी विकसित केले जाणार आहे.

शासकीय योजना आणि खासगी वैद्यकीय संस्थांच्या समन्वयातून आरोग्यसेवा अधिक सुलभ करण्याचा हा प्रयत्न असून, प्रोटॉन थेरपीसारख्या अत्याधुनिक उपचारांची सुविधा पुण्यात सुरू झाल्यास कर्करोग रुग्णांसाठी हा मोठा दिलासा ठरू शकतो.