२० जुलैच्या संसद मोर्चावर दिल्ली पोलिसांचा ब्रेक; परवानगी नाकारत दिला इशारा

२० जुलैच्या संसद मोर्चावर दिल्ली पोलिसांचा ब्रेक; परवानगी नाकारत दिला इशारा
२० जुलैच्या संसद मोर्चावर दिल्ली पोलिसांचा ब्रेक; परवानगी नाकारत दिला इशारा

महाराष्ट्र वाणी

नवी दिल्ली दि १९ :- २० जुलै रोजी प्रस्तावित संसद मोर्चाच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, संसदेकडे काढण्यात येणाऱ्या कोणत्याही मोर्चा, रॅली किंवा मोठ्या जमावाला परवानगी देण्यात आलेली नाही.

पोलिसांच्या माहितीनुसार, संसद अधिवेशन सुरू असल्याने आणि सुरक्षेच्या दृष्टीने खबरदारी म्हणून नवी दिल्ली परिसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) अंतर्गत कलम १६३ लागू करण्यात आले आहे. या आदेशामुळे संबंधित भागात परवानगीशिवाय मोर्चा, निदर्शने किंवा मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

पोलिसांनी इशारा दिला आहे की, आदेशाचे उल्लंघन करून जमाव जमविणे किंवा मोर्चा काढण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कायद्याचे पालन करावे तसेच कोणत्याही अफवा किंवा अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही प्रशासनाने केले आहे.

दरम्यान, या निर्णयानंतर २० जुलै रोजी आंदोलकांची पुढील भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मुद्द्यावर राजकीय स्तरावरही चर्चा आणि आरोप-प्रत्यारोपांना वेग आला असून, पुढील घडामोडी महत्त्वाच्या ठरणार आहेत.