बॉम्बे हायकोर्ट टायपिंग परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ; विद्यार्थ्यांचा संताप, पुनर्परीक्षेची मागणी

बॉम्बे हायकोर्ट टायपिंग परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ; विद्यार्थ्यांचा संताप, पुनर्परीक्षेची मागणी
बॉम्बे हायकोर्ट टायपिंग परीक्षेच्या पहिल्याच दिवशी तांत्रिक गोंधळ; विद्यार्थ्यांचा संताप, पुनर्परीक्षेची मागणी

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १६ :- बॉम्बे हायकोर्टाच्या टायपिंग परीक्षेच्या पहिल्याच दिवशी परीक्षा केंद्रावरील तांत्रिक समस्यांमुळे परीक्षार्थींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागल्याचा प्रकार समोर आला आहे. सुराणा नगर येथील ‘बायट्स इन्फोटेक’ केंद्रावर १६ ऑगस्ट रोजी पहिल्या बॅचची परीक्षा सुरू असताना संगणक आणि सॉफ्टवेअरमध्ये वारंवार बिघाड झाल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांच्या माहितीनुसार, अनेक संगणकांना जोडण्यात आलेले कीबोर्ड व्यवस्थित कार्यरत नव्हते. काही की दाबल्यानंतर स्क्रीनवर अक्षरे दिसत नसल्याने टायपिंगचा वेग मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला. टायपिंग परीक्षेत वेळ आणि वेगाला विशेष महत्त्व असल्याने या तांत्रिक त्रुटींचा थेट परिणाम परीक्षेच्या कामगिरीवर झाल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

इतकेच नव्हे तर परीक्षा सुरू असतानाच काही संगणकांवरील परीक्षा प्रणाली अचानक बंद पडल्याचीही तक्रार करण्यात आली. काही परीक्षार्थी वारंवार आपोआप लॉग-आउट झाल्याने त्यांच्या स्क्रीनवरील टाइप केलेला मजकूरही गायब झाल्याचे सांगण्यात आले. या संपूर्ण प्रकारामुळे परीक्षेचा महत्त्वाचा वेळ वाया गेल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली.

या तांत्रिक अडचणींमुळे प्रभावित झालेल्या विद्यार्थ्यांनी संबंधित यंत्रणेकडे तातडीने दखल घेण्याची मागणी केली आहे. तसेच परीक्षा सुरळीत पार पडली नसल्याने पुनर्परीक्षा घेण्याबाबत स्पष्ट निर्णय जाहीर करावा, अशी मागणीही पुढे आली आहे.

दरम्यान, विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडून ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आता संबंधित प्रशासन आणि उच्च न्यायालय याप्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे परीक्षार्थी आणि त्यांच्या पालकांचे लक्ष लागले आहे.