Blinkitच्या दोन गोडाऊनवर FDAची कारवाई; अन्न परवाना निलंबित, गंभीर त्रुटी उघड
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १८ :- सातारा परिसरातील हायकोर्ट कॉलनी आणि हरसूल भागातील Blinkitच्या दोन आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) धडक कारवाई केली. तपासणीदरम्यान अन्नसुरक्षा, स्वच्छता आणि साठवणुकीसंदर्भातील अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने Blink Commerce Private Limitedचा FSSAI अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
FDAच्या तपासणीत संबंधित ठिकाणी अन्नपदार्थांसोबत सिगारेट विक्री, कालबाह्य अन्नसाठा तसेच शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थांची योग्य नियमांचे पालन न करता एकत्रित साठवणूक केल्याचे निदर्शनास आले. शीतसाखळीचे आवश्यक निकष पाळले जात नसल्याचेही तपासणीत स्पष्ट झाले.
गोडाऊन परिसरात अस्वच्छता, तंबाखूच्या पिचकाऱ्या, तुटलेल्या फरशा आणि उंदरांचा संभाव्य धोका आढळला. शीतगृहातील तापमानाच्या नोंदी ठेवण्यात आलेल्या नव्हत्या. तसेच पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेचा अहवालही उपलब्ध नसल्याचे समोर आले.
कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीची आवश्यक प्रमाणपत्रे नसणे, कामाच्या वेळी ॲप्रन, ग्लोव्हज आणि हेड कॅपचा वापर न करणे, तसेच अन्न खरेदीची बिले आणि पुरवठा साखळीशी संबंधित आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसणे, अशा त्रुटीही तपासणीदरम्यान आढळल्या.
या सर्व बाबींची गंभीर दखल घेत सहायक आयुक्त तथा परवाना प्राधिकारी द. वि. पाटील यांनी Blink Commerce Private Limitedचा FSSAI परवाना निलंबित करण्याचा आदेश जारी केला आहे.
निलंबनाच्या कालावधीत संबंधित आस्थापनांमधून अन्नपदार्थांची खरेदी, विक्री, साठवणूक तसेच Blinkit Appद्वारे ऑनलाइन डिलिव्हरी करण्यास मनाई करण्यात आली आहे. आदेशाचे उल्लंघन केल्यास अन्न सुरक्षा व मानदे कायदा, २००६ अंतर्गत कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.