झाडाझुडपांत हरवलेला इतिहास! ४०० वर्षांपूर्वीची ‘नहर-ए-अंबरी’ आजही सांगते मलिक अंबरच्या दूरदृष्टीची गाथा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि १० :- शहराच्या वैभवशाली इतिहासाची साक्ष देणारी सुमारे ४०० वर्षे जुनी ‘नहर-ए-अंबरी’ जलव्यवस्था आजही अभियांत्रिकी कौशल्याचा अद्भुत नमुना म्हणून उभी आहे. विजेचा, मोटारींचा किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा कोणताही आधार नसताना संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारी ही व्यवस्था तत्कालीन दूरदर्शी शासक मलिक अंबर यांनी उभारली होती.
भूमिगत जलवाहिन्या, जलकुंडे आणि गोमुखांच्या साहाय्याने दूरवरच्या जलस्रोतांतील पाणी केवळ गुरुत्वाकर्षणाच्या तत्त्वावर शहरात पोहोचवले जात होते. त्या काळातील ही व्यवस्था जगातील प्रगत जलपुरवठा व्यवस्थांपैकी एक मानली जाते.
अलीकडेच या ऐतिहासिक जलप्रणालीतील महत्त्वाचा भाग असलेल्या ‘गोमुख’ स्थळाची पाहणी करण्यात आली. आज झाडाझुडपांनी वेढलेल्या या परिसरात कधीकाळी इतिहास अक्षरशः वाहत होता. हे ठिकाण आजही आपल्या समृद्ध वारशाचे, वैज्ञानिक दृष्टिकोनाचे आणि स्थापत्य कौशल्याचे जिवंत उदाहरण ठरत आहे.
या पाहणी व अभ्यास मोहिमेत मिर्झा अब्दुल कय्यूम नदवी आणि गिरीश मगरे यांनी सहभाग घेतला. त्यांनी या ऐतिहासिक वारशाचे संवर्धन आणि जतन करण्याची गरज अधोरेखित केली.
इतिहास हा केवळ भूतकाळाचा ठेवा नसून भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शक असतो. त्यामुळे ‘नहर-ए-अंबरी’सारख्या ऐतिहासिक जलव्यवस्थांचे संरक्षण करणे ही काळाची गरज आहे.
वाचत राहा महाराष्ट्र वाणी — आपल्या इतिहासाचा अभिमान, आपल्या वारशाची ओळख!