सिडको बसस्थानकातील घाणीवर परिवहन मंत्र्यांचा संताप; स्वच्छतागृहाची पाहणी करताच अधिकाऱ्यांना धरले धारेवर

महाराष्ट्र वाणी

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) वि १५ :- सिडको बसस्थानकातील अस्वच्छतेचा मुद्दा ऐरणीवर आला असून, राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज अचानक बसस्थानकाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानकातील स्वच्छतागृहांची दयनीय अवस्था त्यांच्या निदर्शनास आली.

मंत्री सरनाईक यांनी बसस्थानक परिसराची पाहणी करत थेट स्वच्छतागृहाची पाहणी केली. यावेळी परिसरात पसरलेली दुर्गंधी, साचलेले घाण पाणी आणि स्वच्छतेचा अभाव पाहून त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

दररोज मोठ्या संख्येने प्रवासी ये-जा करणाऱ्या बसस्थानकातील स्वच्छतागृहांची अशी अवस्था पाहून मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला. प्रवाशांना मूलभूत सुविधा आणि स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी प्रशासनाची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रवाशांच्या आरोग्याशी कोणत्याही प्रकारची तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत सरनाईक यांनी संबंधित यंत्रणेला स्वच्छतेच्या कामात तातडीने सुधारणा करण्याच्या सूचना दिल्या.

मंत्र्यांच्या अचानक पाहणीमुळे बसस्थानकातील स्वच्छता आणि प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सुविधांचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.