ग्रामीण प्रश्नांचा बुलंद आवाज आता कामगारांच्या हक्कासाठी! योगेश मुऱ्हेकर शिवसेना श्रमिक कामगार संघटनेचे जिल्हाप्रमुख
महाराष्ट्र वाणी
चंद्रपूर (प्रतिनिधी) दि १८ :- ग्रामीण भागातील ज्वलंत प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणारे अभ्यासू पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि ‘युवा शक्ती ग्राम विकास संघटने’चे जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर यांची शिवसेना श्रमिक कामगार संघटनेच्या चंद्रपूर जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण प्रश्नांसाठी बुलंद आवाज उठवणारे मुऱ्हेकर आता जिल्ह्यातील कामगारांच्या हक्कासाठी मैदानात उतरले आहेत.
शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि शिवसेना मुख्य सचिव संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही नियुक्ती करण्यात आली. शिवसेना श्रमिक कामगार संघटनेचे प्रदेश सचिव अमित आर. भटपार यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत नियुक्तीपत्र महाराष्ट्राचे कामगार राज्यमंत्री मा. ना. अॅड. आशिष जयस्वाल यांच्या हस्ते नागपूर येथील रवी भवन येथे मुऱ्हेकर यांना प्रदान करण्यात आले.
या नियुक्तीमध्ये शिवसेना चंद्रपूर जिल्हाप्रमुख बंडूभाऊ हजारे यांची भूमिका महत्त्वाची ठरली. सामाजिक, पत्रकारिता आणि ग्रामविकास क्षेत्रातील योगेश मुऱ्हेकर यांच्या कार्याची दखल घेत हजारे यांनी त्यांच्या नियुक्तीसाठी विशेष पाठपुरावा केला.
पत्रकारितेच्या माध्यमातून शेतकरी, कामगार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने आवाज उठवणाऱ्या मुऱ्हेकर यांच्यासमोर आता नवी जबाबदारी आहे. संघटित आणि असंघटित क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न शासन-प्रशासनाच्या दरबारात मांडणे, कामगारांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे, त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करणे आणि चंद्रपूर जिल्ह्यात संघटनेची मजबूत बांधणी करणे, हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असणार आहे.
दरम्यान, योगेश मुऱ्हेकर यांच्या नियुक्तीचे वृत्त समोर येताच शिवसैनिक, कामगार, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते तसेच मित्रपरिवाराकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण प्रश्नांवर आक्रमकपणे भूमिका मांडणारे मुऱ्हेकर आता कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी किती प्रभावीपणे आवाज उठवतात, याकडे चंद्रपूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
ग्रामीण जनतेचा आवाज ते कामगारांच्या हक्कांचा बुलंद आवाज—योगेश मुऱ्हेकर यांच्या नव्या जबाबदारीने चंद्रपुरातील कामगार संघटनेला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.