एच. जे. थीम कॉलेजचा 'मिशन 100 ट्रीज' उपक्रम यशस्वी; शंभर वृक्षांचे वृक्षारोपण
महाराष्ट्र वाणी
जळगाव दि १ ऑगस्ट :- पर्यावरण संवर्धन, जैवविविधतेचे संरक्षण आणि भावी पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित एच. जे. थीम कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, जळगावच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) विभागातर्फे 'मिशन 100 ट्रीज' हा विशेष उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत महाविद्यालय परिसरात विविध प्रजातींच्या शंभर वृक्षांची लागवड करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ. अब्दुल करीम सालार होते, तर संस्थेचे सचिव एजाज अहमद मलिक प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी आणि सदस्यांनीही वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेतला.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वकार शेख यांनी वृक्षांचे पर्यावरणीय, सामाजिक आणि आर्थिक महत्त्व अधोरेखित करत प्रत्येक नागरिकाने दरवर्षी किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचे आवाहन केले.
राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. इरफान शेख यांनी 'मिशन 100 ट्रीज' उपक्रमामागील उद्दिष्ट स्पष्ट करताना वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनालाही तितकेच महत्त्व असल्याचे सांगितले. "फक्त वृक्ष लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन करून त्यांना मोठे करणे हीच खरी पर्यावरण सेवा आहे," असे त्यांनी नमूद केले.
यावेळी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी डॉ. हाफिज शेख आणि महिला कार्यक्रम अधिकारी डॉ. फिरदौस शेख यांनी पर्यावरण संरक्षणासाठी युवकांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगून विद्यार्थ्यांना अधिकाधिक वृक्ष लागवडीसाठी प्रेरित केले.
या उपक्रमात महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी वृक्षांचे संगोपन, पाणीपुरवठा आणि संरक्षण करण्याची सामूहिक शपथ घेतली.
महाविद्यालय प्रशासनातर्फे भविष्यातही पर्यावरण संवर्धनासाठी अशा उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व आणि निसर्गप्रेमाची भावना रुजविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.