बिडकीन पोलिसांची कारवाई; घरफोडीचा 24 तासांत छडा; ₹1.98 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त

बिडकीन पोलिसांची कारवाई; घरफोडीचा 24 तासांत छडा; ₹1.98 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त
बिडकीन पोलिसांची कारवाई; घरफोडीचा 24 तासांत छडा; ₹1.98 लाखांचा मुद्देमाल हस्तगत!सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम जप्त

महाराष्ट्र वाणी

पैठण दि १८ :- लामगव्हाण येथे घराचे कुलूप तोडून करण्यात आलेल्या घरफोडीचा बिडकीन पोलिसांनी अवघ्या २४ तासांत छडा लावत चोरीस गेलेला तब्बल ₹1 लाख 98 हजार 600 किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणात दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग निष्पन्न झाला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

लामगव्हाण येथील रहिवासी प्रसाद संजय मिसाळ हे १५ ऑगस्ट रोजी सकाळी घराला कुलूप लावून छत्रपती संभाजीनगर येथे गेले होते. दुसऱ्या दिवशी, १६ ऑगस्ट रोजी सकाळी घरी परतल्यानंतर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील कपाट उघडे असून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम चोरीस गेल्याचे निदर्शनास आले.

याप्रकरणी बिडकीन पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 511/2026, कलम 305(A), 331(4) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक तपास तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली.

तपासादरम्यान दोन विधीसंघर्षग्रस्त बालकांचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाला. त्यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल अवघ्या २४ तासांच्या आत हस्तगत करण्यात आला.

हस्तगत केलेला मुद्देमाल

१० ग्रॅम सोन्याचे दागिने – अंदाजे ₹1,41,600

चांदीची २० नाणी व दागिने – अंदाजे ₹17,000

रोख रक्कम – ₹40,000

एकूण मुद्देमाल – ₹1,98,600

या गुन्ह्याचा पुढील तपास सुरू असून प्रकरणातील इतर बाबींचा तपास पोलीस करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत स्वामी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके, पोलीस उपनिरीक्षक मनजितसिंग सेना तसेच बिडकीन पोलीस ठाण्यातील पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.

टीप : प्रकरणात विधीसंघर्षग्रस्त बालकांचा सहभाग असल्याने त्यांची नावे, छायाचित्रे किंवा ओळख पटेल अशी कोणतीही माहिती प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.