मुदतबाह्य मसाले, चहा अन् खराब खोबरे विक्रीसाठी! वैजापूरच्या ‘परमेश्वरी सुपर शॉपी’वर FDAची धडक कारवाई

मुदतबाह्य मसाले, चहा अन् खराब खोबरे विक्रीसाठी! वैजापूरच्या ‘परमेश्वरी सुपर शॉपी’वर FDAची धडक कारवाई
मुदतबाह्य मसाले, चहा अन् खराब खोबरे विक्रीसाठी! वैजापूरच्या ‘परमेश्वरी सुपर शॉपी’वर FDAची धडक कारवाई

महाराष्ट्र वाणी

वैजापूर दि १९ :- वैजापूर शहरातील लाडगाव रोडवरील ‘मे. परमेश्वरी सुपर शॉपी’वर अन्न व औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत मुदतबाह्य तसेच खराब अन्नपदार्थांचा साठा आढळून आल्याचे उघड केले आहे. या कारवाईमुळे परिसरातील किरकोळ अन्नविक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

सहाय्यक आयुक्त विवेक पाटील यांच्या निर्देशानुसार अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्र. प्र. सुरसे यांच्या पथकाने सुपर शॉपीची अचानक तपासणी केली. तपासणीदरम्यान ग्राहकांच्या आरोग्याच्या दृष्टीने गंभीर बाबी समोर आल्या.

दुकानात मुदत संपलेले मसाले, चहा पावडर, कसुरी मेथी, मनुके आदी अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. याशिवाय मानवी आरोग्यास घातक ठरू शकणारे खराब झालेले अन्नपदार्थ, त्यात सुके खोबरेही साठवून ठेवल्याचे आढळले.

दुकानातील अस्वच्छतेसोबतच अन्नपदार्थांच्या साठवणुकीतही नियमांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत दिसून आले. अनेक अन्नपदार्थ थेट जमिनीवर ठेवण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक पॅलेटची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. तसेच खाद्य आणि अखाद्य वस्तू स्वतंत्रपणे न ठेवता एकत्रित साठवणूक केल्याचेही आढळले.

या सर्व बाबींची अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली. पंच आनंद श्रीराम धोंडवे आणि उपस्थित व्यक्ती सिद्धार्थ विजयकुमार बोथरा यांच्या उपस्थितीत कायदेशीर पंचनामा करण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

“नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या व्यावसायिकांविरोधात यापुढेही कठोर कारवाई केली जाईल,” असा इशारा अन्न व औषध प्रशासनाच्या छत्रपती संभाजीनगर विभागाचे संयुक्त आयुक्त श्रीकांत करकळे यांनी दिला आहे.

मुदतबाह्य अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवणे, खराब खाद्यपदार्थांचा साठा करणे आणि अस्वच्छतेकडे दुर्लक्ष करणे व्यवसायिकांना चांगलेच महागात पडू शकते, हे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.