"मी सेनापती होतो, पण अजूनही रणभूमीत आहे!" – जयंत पाटलांचं भावनिक भाषण, शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपद

"मी सेनापती होतो, पण अजूनही रणभूमीत आहे!" – जयंत पाटलांचं भावनिक भाषण, शशिकांत शिंदेंकडे प्रदेशाध्यक्षपद

महाराष्ट्र वाणी 

मुंबई, दि. १५ जुलै :- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षात मोठे संघटनात्मक बदल झाले आहेत. पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला असून, त्यांच्या जागी आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी शरद पवार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, शशिकांत शिंदे आदी प्रमुख नेते उपस्थित होते.

या वेळी जयंत पाटील यांनी आपल्या निरोपपर भाषणातून भावनिक सूर लावला. "मी एक सेनापती होतो, पण माझी सेना अजूनही सज्ज आहे. मी जात आहे, पण मागे हटत नाही," अशा शब्दांत त्यांनी आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. त्यांनी कवितेच्या माध्यमातून आपल्या राजकीय प्रवासाची झलक दिली.

 "मुख्य सेनापती होतो, पण सेना अजूनही सज्ज आहे.

नव्या युगातही शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार हेच आमचे शस्त्र आहेत.

मी जातो आहे, पण माझं ध्येय सोडलेलं नाही.

कामातूनच ओळख निर्माण होते, कारण मी जयंत आहे!"

पाटलांच्या या भावनिक भाषणावर उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला.

दरम्यान, नव्या प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधत सांगितले की, "ही जबाबदारी माझ्यासाठी सन्मानाची आहे. राज्यातील प्रत्येक प्रश्नावर आवाज उठवण्याचे आणि पक्ष संघटना अधिक बळकट करण्याचे काम प्रामाणिकपणे करणार आहे. पक्षात अनेक वरिष्ठ नेते असतानाही मला ही संधी दिली गेली, तिचं सोनं करीन."