प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जोरदार प्रचार प्रारंभ, तांगडे पाटील यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन

प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जोरदार प्रचार प्रारंभ, तांगडे पाटील यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन
प्रभाग 1 मध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जोरदार प्रचार प्रारंभ, तांगडे पाटील यांच्या हस्ते कार्यालय उद्घाटन

महाराष्ट्र वाणी 

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. ६

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराची रणधुमाळी वेग घेत असताना हर्सुल परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रचाराचा अधिकृत शुभारंभ करण्यात आला. प्रभाग क्रमांक 1 मधील अधिकृत उमेदवार शेख अयूब पटेल व पुरस्कृत उमेदवार एड. विजयश्री अण्णा मोकळे यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन पक्षाचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांच्या शुभहस्ते पार पडले.

उद्घाटनानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करत परिसरात भव्य रॅली काढण्यात आली. या रॅलीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

यावेळी जिल्हा सचिव प्राचार्य सलिम शेख यांनी मतदारांशी संवाद साधत कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी न पडता दोन्ही उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन केले.

तर जिल्हाध्यक्ष पांडुरंग तांगडे पाटील यांनी प्रभागातील पाणीटंचाई, कचरा व्यवस्थापन, रस्ते रुंदीकरण तसेच मूलभूत सुविधांचा अभाव याकडे लक्ष वेधले. सत्ताधारी पक्षांनी या भागाचा अपेक्षित विकास केला नसल्याने आता मतदारांसमोर सक्षम पर्याय उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. निवडून आल्यानंतर नागरी समस्यांना प्राधान्य देऊन सोडवले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमास प्राचार्य सलिम शेख, वाजेद अस्लम, थोरात, बाबुराव पंडित, मोकळे अण्णा, अब्दुल अजिम यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

👉 प्रभाग 1 मधील लढत आता अधिक रंगतदार होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.