परदेशातील उच्च शिक्षणासाठी अल्पसंख्याक समाजातील ६८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर; फडणवीस सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
मुंबई दि १३ :- महाराष्ट्र सरकारच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने यंदा ६८ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे.
मंजूर झालेल्या शिष्यवृत्तीमध्ये मुस्लिम समाजातील ४२ विद्यार्थी, नवबौद्ध समाजातील १५, जैन समाजातील ५, ख्रिश्चन समाजातील ४ आणि शीख समाजातील २ विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
परदेशातील नामांकित विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेण्याचे स्वप्न असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती मोठी आधारवड ठरणार आहे. आर्थिक अडचणींमुळे उच्च शिक्षणाच्या संधींपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे पुढील शिक्षणासाठी नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
या निर्णयाचे स्वागत करताना महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारेजिया खान यांनी सर्व निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी घेतलेल्या या निर्णयाबद्दल महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी आभार मानले.
शिक्षणाच्या माध्यमातून तरुणांच्या आकांक्षांना बळ देणे आणि त्यांना जागतिक स्तरावर प्रगतीची संधी उपलब्ध करून देणे, या दृष्टीने सरकारचा हा उपक्रम महत्त्वाचा मानला जात आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
"महाराष्ट्र वाणी" सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित