सुट्टे खाद्यतेल विक्रीबंदीवरून व्यापारी आक्रमक; तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात १५ दिवसांचा अल्टिमेटम

सुट्टे खाद्यतेल विक्रीबंदीवरून व्यापारी आक्रमक; तुकाराम मुंढेंच्या निर्णयाविरोधात १५ दिवसांचा अल्टिमेटम

महाराष्ट्र वाणी

नाशिक (प्रतिनिधी) दि २४ :- राज्यात सुट्टे खाद्यतेल विक्री आणि खरेदीवर निर्बंध घालण्याच्या अन्न व औषध प्रशासनाच्या निर्णयावरून खाद्यतेल व्यापारी आक्रमक झाले आहेत. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या भूमिकेला विरोध करण्यासाठी राज्यातील व्यापाऱ्यांची नाशिकमध्ये बैठक झाली. या बैठकीत सरकारला निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी १५ दिवसांची मुदत देण्यात आली असून, तोडगा न निघाल्यास आंदोलनासह न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला आहे.

१५ दिवसांत निर्णय मागे घेण्याची मागणी

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील बंदीचा निर्णय व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर मोठा परिणाम करणारा असल्याचे बैठकीत सांगण्यात आले. हा निर्णय मागे घेण्यासाठी राज्य सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी करण्यात आली.

पंधरा दिवसांत सरकारकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यासोबतच केंद्र सरकारकडेही पाठपुरावा करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

नियमांचे उल्लंघन झाल्यास मोठा दंड आणि कारावासाच्या तरतुदीवरही व्यापाऱ्यांनी आक्षेप घेतला. कठोर शिक्षेच्या तरतुदीवर नाराजी व्यक्त करत व्यापाऱ्यांनी, “आम्ही अतिरेकी आहोत का?” असा संतप्त सवाल उपस्थित केला.

नियमभंग आणि भेसळीवर कठोर कारवाईचा इशारा

दरम्यान, तुकाराम मुंढे यांनी खाद्यतेलाच्या बाबतीत नियमांचे उल्लंघन अथवा भेसळ आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. भेसळयुक्त खाद्यतेलाच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. संबंधित कायद्यानुसार काही प्रकरणांमध्ये सात वर्षांपासून जन्मठेपेपर्यंत शिक्षेची तरतूद असल्याचे त्यांनी सांगितले.

भेसळ तसेच दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींच्या प्रकरणात १० लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

ग्राहकांनी पॅकेज्ड तेल घेताना काळजी घ्यावी

नागरिकांनी सुट्टे खाद्यतेल खरेदी न करता पॅकेज्ड तेलाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तेलाची खरेदी करताना पॅकेटवरील लेबल, सील, उत्पादनाची माहिती आणि मुदत (Expiry Date) तपासावी, असेही सांगण्यात आले.

वारंवार वापरलेल्या तेलापासूनही सावध राहण्याचे आवाहन

खाद्यतेलाचा प्रश्न केवळ भेसळ किंवा आर्थिक फसवणुकीपुरता मर्यादित नसून त्याचा थेट संबंध नागरिकांच्या आरोग्याशी आहे, अशी भूमिका मुंढे यांनी मांडली. भेसळयुक्त किंवा अयोग्य पद्धतीने वापरलेल्या तेलामुळे आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका असल्याचे त्यांनी नमूद केले.

घरामध्ये एकदा तळण्यासाठी वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरू नये. तसेच हॉटेल किंवा खाद्यपदार्थांच्या ठिकाणी तेलाचा वारंवार पुनर्वापर होत असल्याचे आढळल्यास ग्राहकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

सुट्टे खाद्यतेल विक्रीबंदीचा निर्णय आणि व्यापाऱ्यांचा विरोध यामुळे आता राज्य सरकार यावर काय भूमिका घेते, याकडे व्यापारी आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.