पिकांचे मोठे नुकसान; सिल्लोड-सोयगावात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आमदार अब्दुल सत्तारांची मागणी

पिकांचे मोठे नुकसान; सिल्लोड-सोयगावात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आमदार अब्दुल सत्तारांची मागणी
पिकांचे मोठे नुकसान; सिल्लोड-सोयगावात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची आमदार अब्दुल सत्तारांची मागणी

महाराष्ट्र वाणी

सिल्लोड दि ११ :- सिल्लोड-सोयगाव विधानसभा मतदारसंघात पावसाने दीर्घ खंड दिल्याने खरीप पिकांवर संकट ओढवले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड, अजिंठा, शिवना, पिंपळदरी, डोंगरगाव आदी भागांत शेतांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पिकांची पाहणी केली. तसेच विविध गावांमध्ये बैठका घेऊन शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना धीर दिला.

पावसाअभावी सोयाबीन, कापूस, मका, मूग आणि उडीद या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर बनली आहे. त्यामुळे सिल्लोड-सोयगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आमदार अब्दुल सत्तार यांनी केली.

दरम्यान, गावपातळीवर पीक नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करून आवश्यक कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. नुकसानग्रस्त व पात्र शेतकऱ्यांना पीकविमा तसेच शासनाच्या विविध मदतीचा लाभ मिळावा, यासाठीही विशेष पाठपुरावा केला जात असल्याचे सत्तार यांनी सांगितले.

पावसाच्या खंडामुळे निर्माण झालेल्या या संकटात शेतकऱ्यांना दिलासा मिळावा आणि त्यांना शासनाकडून योग्य मदत मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे आमदार अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले.

— अखलाख देशमुख | महाराष्ट्र वाणी