अल्पसंख्याक तरुणांच्या शिक्षण-रोजगाराला नवी दिशा; वक्फ मंडळात अनुकंपा नियुक्ती आणि संशोधन-प्रशिक्षण संस्थेच्या समितीची स्थापना
महाराष्ट्र वाणी
पुणे दि ४ :- महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजातील तरुणांच्या शिक्षणाला, कौशल्यविकासाला आणि रोजगाराच्या संधींना नवी दिशा देणारे महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक व व्यावसायिक प्रगतीसाठी अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या समितीची स्थापना करण्यात आली आहे. या संदर्भातील शासन निर्णयही जारी करण्यात आला आहे.
या निर्णयांमुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, संशोधन, प्रशिक्षण आणि रोजगाराच्या क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
' दिवगंत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून अल्पसंख्याक समाजाच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक विकासासाठी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची संकल्पना पुढे आली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी संबंधित विविध गरजा, कौशल्यविकास, प्रशिक्षण तसेच रोजगाराभिमुख उपक्रमांना चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळात पात्र वारसांना अनुकंपा तत्त्वावर नोकरी देण्याचा निर्णयही महत्त्वपूर्ण मानला जात आहे. या निर्णयामुळे संबंधित पात्र कुटुंबांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊन आर्थिक स्थैर्य मिळण्यास मदत होणार आहे.
या दोन्ही महत्त्वपूर्ण निर्णयांबद्दल आनंद आणि समाधान व्यक्त करण्यासाठी अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आज पुणे येथे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाच्या या निर्णयांबद्दल त्यांचे आभार मानले.
भेटीदरम्यान सुनेत्राताई पवार यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या शिक्षणाबाबतच्या अपेक्षा, भविष्यातील ध्येय आणि स्वप्नांविषयी जाणून घेतले. उच्च शिक्षणाच्या संधी अधिक व्यापक व्हाव्यात, प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांना रोजगारक्षम बनवावे आणि अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहातील विविध संधींशी जोडावे, अशा अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या.
अल्पसंख्याक समाजातील तरुणांना केवळ शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे नव्हे, तर त्यांना सक्षम, कुशल आणि रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने हे निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रभावी उपक्रम राबविले जातील, अशी अपेक्षाही व्यक्त होत आहे.
एकीकडे पात्र वारसांसाठी अनुकंपा तत्त्वावरील रोजगाराची संधी आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण व प्रशिक्षणाच्या नव्या वाटा खुल्या करणारा हा निर्णय अल्पसंख्याक समाजाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.