१२ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबरपर्यंत ग्रामीणमध्ये १४ दिवस जमावबंदी; शस्त्रबंदीचे आदेश

आदेश लागू; मोर्चे, धरणे आणि पाचपेक्षा अधिक जणांच्या जमावावर निर्बंध

१२ सप्टेंबरपासून २६ सप्टेंबरपर्यंत ग्रामीणमध्ये १४ दिवस जमावबंदी; शस्त्रबंदीचे आदेश

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)ग्रामीण, दि. ११ : जिल्ह्यातील सार्वजनिक शांतता आणि कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी छत्रपती संभाजीनगर ग्रामीण जिल्ह्याच्या हद्दीत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. हे आदेश १२ सप्टेंबर रोजी रात्री १२.०१ वाजेपासून २६ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहेत.

अपर जिल्हादंडाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील कलम ३७ (१) व (३) अन्वये हे आदेश जारी केले आहेत.

या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे, लाठ्या-काठ्या किंवा इजा करण्यासाठी वापरता येणाऱ्या वस्तू बाळगण्यास अथवा साठवण्यास मनाई राहणार आहे. त्याचबरोबर दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड अथवा इतर क्षेपणास्त्रे बाळगण्यावरही निर्बंध घालण्यात आले आहेत.

प्रक्षोभक भाषण, घोषणा आणि आक्षेपार्ह फलकांवरही बंदी

सार्वजनिक शांतता भंग होण्याची शक्यता असलेल्या घोषणा, प्रक्षोभक भाषणे, हावभाव किंवा ध्वनिक्षेपण करण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच आक्षेपार्ह चित्रे, चिन्हे किंवा फलकांचे प्रदर्शन अथवा प्रसार करण्यासही निर्बंध असतील.

पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावावर निर्बंध

आदेशाच्या कालावधीत सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र जमण्यास मनाई राहणार आहे. तसेच निदर्शने, धरणे, मोर्चे आणि मिरवणुका काढण्यावरही निर्बंध लागू असतील.

या कार्यक्रमांना आदेशातून सूट

दरम्यान, कर्तव्यावरील पोलीस व शासकीय कर्मचारी, विवाह समारंभ, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा तसेच सक्षम अधिकाऱ्यांची विशेष परवानगी असलेल्या कार्यक्रम आणि मिरवणुकांना या आदेशातून सूट देण्यात आली आहे.

विशेष कार्यक्रम किंवा मिरवणुकीसाठी आवश्यक परवानगी देण्याचे अधिकार छत्रपती संभाजीनगर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक यांनी प्राधिकृत केलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना राहणार आहेत.

 

महाराष्ट्र वाणी 

सत्यासाठी निर्भीड | जनतेसाठी समर्पित