रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा
रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना नेस्तनाबूत करू; मुख्यमंत्री फडणवीसांचा इशारा

महाराष्ट्र वाणी

सरलाबेट दि २५ :- सरला बेट येथे आयोजित श्री संत सद्गुरू योगीराज गंगागिरीजी महाराज यांच्या १७९व्या अखंड हरिनाम सप्ताहाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह विविध राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी वारकरी संप्रदायाच्या परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत सरला बेटाच्या विकासाबाबतही मोठी घोषणा केली.

रामगिरी महाराजांना दिल्या जाणाऱ्या धमक्यांचा मुद्दा उपस्थित करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी आक्रमक भूमिका घेतली. “रामगिरी महाराजांना धमक्या देणाऱ्यांना आम्ही नेस्तनाबूत करू. येथील कोणाच्याही केसालाही हात लावू देणार नाही,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.

धर्माच्या नावावर कोणी अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल, तर त्याचा सामना करण्यासाठी आपण सर्वांच्या पुढे उभे राहू, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. प्रत्येकाने आपल्या धर्माचे पालन करावे; मात्र त्याचवेळी इतर धर्मांचाही आदर करावा, असे आवाहन त्यांनी केले.

‘शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या माध्यमातून सरकारचे काम’

आपल्या सरकारला जनतेची ताकद मिळाली आहे. त्याच बळावर आपण सत्तेत आहोत आणि शेतकरी व कष्टकऱ्यांच्या हितासाठी सरकार काम करत असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

शेतकरी कर्जमाफीच्या उपक्रमाचा उल्लेख करत त्यांनी सरकारच्या विविध निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘वारकरी परंपरेने समाजाला एकत्र ठेवले’

महाराष्ट्रावर विविध काळात आक्रमणे झाली, किल्ले जिंकले गेले आणि मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली; मात्र महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा आणि वारकरी संप्रदायाची परंपरा अबाधित राहिली, असे मुख्यमंत्री म्हणाले.

पंढरपूरकडे जाणारी वारकऱ्यांची पावले आणि अखंड हरिनामाची परंपरा आजही कायम आहे. हरिनामाच्या माध्यमातून समाज एकत्र येतो आणि जात-पात, भेदाभेद बाजूला ठेवून एकात्मतेचा संदेश दिला जातो. सरला बेटावरील १७९ वर्षांची ही परंपरा त्याचेच उदाहरण असल्याचे फडणवीस यांनी नमूद केले.

सरला बेटाला प्रमुख तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचे संकेत

सरकारने सरला बेटाच्या विकासासाठी आराखडा तयार केला असून त्यानुसार काम सुरू असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. भविष्यात सरला बेट हे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ऊर्जेचे केंद्र म्हणून विकसित करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, प्रमुख तीर्थस्थळ म्हणून त्याचा विकास केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

दरम्यान, कार्यक्रमातील वातावरणही उत्साहपूर्ण पाहायला मिळाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी फुगडी खेळली. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रामगिरी महाराज यांच्यातही फुगडीचा खेळ रंगला.