जळगावच्या हृदयविकार उपचार क्षेत्रात ऐतिहासिक यश! स्टेंटविनाच अँजिओप्लास्टी यशस्वी; ड्रग-एल्यूटिंग बलूनच्या मदतीने अभिनव उपचार

जळगावच्या हृदयविकार उपचार क्षेत्रात ऐतिहासिक यश! स्टेंटविनाच अँजिओप्लास्टी यशस्वी; ड्रग-एल्यूटिंग बलूनच्या मदतीने अभिनव उपचार

महाराष्ट्र वाणी

जळगाव दि १० :- हृदयविकाराच्या उपचार क्षेत्रात जळगाव जिल्ह्याने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. जळगावमध्ये प्रथमच स्टेंट न बसवता ड्रग-एल्यूटिंग बलूनच्या माध्यमातून अँजिओप्लास्टी यशस्वीपणे करण्यात आली. या आधुनिक उपचारपद्धतीमुळे गंभीर हृदयविकाराचा सामना करणाऱ्या एका गरजू रुग्णाला मोठा दिलासा मिळाला आहे.

जळगाव जिल्ह्यातील एका रुग्णाला हृदयाशी संबंधित त्रासामुळे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तपासणीत हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे असल्याचे निदर्शनास आले. विशेषतः हृदयाच्या खालच्या भागातील ब्लॉकेजवर उपचार करणे आव्हानात्मक असल्याचे काही डॉक्टरांनी रुग्णाच्या नातेवाईकांना सांगितले होते.

रुग्णाची आर्थिक परिस्थितीही अत्यंत हलाखीची असल्याने महागडा उपचार करणे कुटुंबासाठी मोठे आव्हान होते. अशा परिस्थितीत हार्ट प्लस हॉस्पिटलचे कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप भारुडे यांनी पुढाकार घेतला.

डॉ. ए.जी. भंगाळे यांच्या समर्थ हॉस्पिटलमध्ये ड्रग-एल्यूटिंग बलूनच्या साहाय्याने स्टेंट न वापरता अँजिओप्लास्टी करण्यात आली. या पद्धतीत विशेष औषधयुक्त बलूनचा वापर करून रक्तवाहिनीतील अडथळ्यावर उपचार केला जातो. जळगावमध्ये अशा आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रथमच यशस्वी वापर झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

या उपचारामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले. आर्थिक अडचणी लक्षात घेऊन आयुष्मान भारत योजनेअंतर्गत हा उपचार मोफत करण्यात आला, त्यामुळे कुटुंबावर उपचाराचा आर्थिक भार पडला नाही.

दरम्यान, आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञानाचा वापर करून जळगावमध्ये हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक प्रभावी उपचार उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वाची मानली जात आहे.

भविष्यातही हृदयरोगाच्या उपचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून गरजू रुग्णांना त्याचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न राहील, असे कार्डिओलॉजिस्ट डॉ. संदीप भारुडे यांनी सांगितले.