घाटीच्या नव्या सर्जिकल इमारतीचे १७ सप्टेंबरला भूमिपूजन; ७१० कोटींच्या निधीतून उभारणार १२ मजली अत्याधुनिक इमारत
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ; कर्करोग रुग्णालयातील पेट स्कॅन, रेडिएशन यंत्रणा आणि धर्मशाळेचेही लोकार्पण
महाराष्ट्र वाणी वृतसेवा
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद), दि. १० (प्रतिनिधी) : मराठवाड्यातील आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अर्थात घाटीचा लवकरच कायापालट होणार आहे. सुमारे ७० वर्षे जुन्या सर्जिकल इमारतीची जागा आता अत्याधुनिक १२ मजली इमारत घेणार असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी शासनाने ७१०.२५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवीन सर्जिकल इमारतीचे भूमिपूजन होणार असल्याची माहिती घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी दिली.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री संजय शिरसाट, मंत्री अतुल सावे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह इतर मंत्री, अभ्यागत समितीचे सदस्य आणि स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
५० वर्षांच्या गरजा लक्षात घेऊन नवी इमारत
घाटी रुग्णालयात मराठवाड्यासह खान्देश, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील रुग्ण उपचारासाठी येतात. दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या आणि जुन्या सर्जिकल इमारतीचे पूर्ण झालेले आयुष्यमान लक्षात घेऊन पुढील सुमारे ५० वर्षांच्या गरजा डोळ्यासमोर ठेवून नवीन इमारतीची आखणी करण्यात आली आहे.
नवीन १२ मजली इमारतीत अपघात विभाग, रेडिओलॉजी, ओपीडी, प्रसूती विभाग, अस्थिरोग आणि विविध सर्जिकल विभागांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल. एका मजल्यावर ऑपरेशन थिएटरची एकत्रित सुविधा उभारण्यात येणार आहे. डॉक्टर तसेच रुग्णांच्या नातेवाईकांसाठी स्वतंत्र उपहारगृहाची सुविधाही प्रस्तावित आहे.
कर्करोग रुग्णांसाठी धर्मशाळेची सुविधा
राज्य कर्करोग रुग्णालयात राज्यातील विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येतात. कर्करोगावरील उपचार दीर्घकाळ सुरू राहतात. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याची सोय उपलब्ध व्हावी, या मागणीला आता मूर्त रूप मिळणार आहे.
धर्मशाळा उभारण्यासाठी शासनाने १४.८८ कोटी रुपये मंजूर केले असून, या प्रकल्पाचेही भूमिपूजन १७ सप्टेंबरला होणार आहे.
घाटीत शासकीय क्षेत्रातील पहिले पेट स्कॅन केंद्र
राज्य कर्करोग रुग्णालयात सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर सुमारे ७.९४ कोटी रुपये खर्चाचे पेट स्कॅन केंद्र उभारण्यात आले आहे. कर्करोगाचे अचूक निदान आणि पुढील उपचाराची दिशा निश्चित करण्यासाठी ही सुविधा महत्त्वाची ठरणार आहे.
खासगी रुग्णालयांमध्ये पेट स्कॅनसाठी साधारणपणे २० हजार रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाते. मात्र, घाटीत दारिद्र्यरेषेखालील तसेच विविध शासकीय योजनांसाठी पात्र रुग्णांना ही तपासणी मोफत करण्यात येणार आहे. इतर रुग्णांसाठी सुमारे ३ हजार रुपये शुल्क आकारले जाणार आहे.
३० कोटींच्या अत्याधुनिक किरणोपचार यंत्रणांचे लोकार्पण
कर्करोग रुग्णांच्या उपचारासाठी किरणोपचार विभागात अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित हॅल्सियन रेडिएशन प्रणाली आणि कोबाल्ट ब्रेकीथेरपी यंत्रणा बसविण्यात आली आहे. या दोन्ही सुविधांची एकत्रित किंमत सुमारे ३० कोटी रुपये असून, त्यांचेही लोकार्पण या कार्यक्रमात करण्यात येणार आहे.
याशिवाय अर्धांगवायूच्या रुग्णांसाठी न्यूरो रिहॅबिलिटेशनची सुमारे १५ कोटी रुपयांची यंत्रणा एसएसबी येथे स्थापित करण्यात आली असून, तिचेही लोकार्पण नियोजित आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारीचा आढावा
जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी गुरुवारी घाटी रुग्णालयाला भेट देऊन नवीन सर्जिकल इमारतीच्या नियोजित जागेची पाहणी केली. १७ सप्टेंबर रोजी होणाऱ्या भूमिपूजनाच्या तयारीचा त्यांनी आढावा घेतला.
यानंतर त्यांनी राज्य कर्करोग रुग्णालयातील पेट स्कॅन केंद्र, प्रस्तावित धर्मशाळा आणि किरणोपचार विभागातील अत्याधुनिक यंत्रणांची पाहणी केली.
यावेळी घाटीचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेश हरबडे, उपअधिष्ठाता डॉ. भारत सोनवणे, राज्य कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अरविंद गायकवाड आदी उपस्थित होते.
हेलिपॅडमुळे अवयवदानाला मिळणार गती
नवीन सर्जिकल इमारतीच्या आराखड्यात भविष्यातील अवयवदानाची गरजही विचारात घेण्यात आली आहे. शहरातील विमानतळ आणि महामार्ग बाहेरील भागात असल्याने आपत्कालीन परिस्थितीत अवयवांची जलद वाहतूक करण्यासाठी इमारतीच्या बाराव्या मजल्यावर हेलिपॅडची सुविधा उपलब्ध झाल्यास मोठा फायदा होऊ शकतो.
अवयवदान चळवळीला भविष्यात मोठी चालना मिळाल्यास घाटीतून अवयव अल्पावधीत दुसऱ्या शहरातील रुग्णालयात पोहोचवणे सुलभ होईल, असा विश्वास अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांनी व्यक्त केला.
नवीन सर्जिकल इमारत, कर्करोग रुग्णालयातील पेट स्कॅन, अत्याधुनिक किरणोपचार सुविधा, न्यूरो रिहॅबिलिटेशन आणि रुग्णांच्या नातेवाईकांसाठी धर्मशाळा अशा विविध प्रकल्पांमुळे छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्याच्या शासकीय आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.