आनंदाचा शिधा कुठे गायब झाला?; दिपक केदारांचा सरकारला सवाल
ऑगस्टमध्ये अपेक्षित असलेले वाटप अद्याप नाही; सणासुदीच्या काळात साखरेच्या दरवाढीवरही सरकारवर निशाणा
महाराष्ट्र वाणी
छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) दि २४ :- गणेशोत्सव आणि सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना दिलासा मिळावा, यासाठी राज्य सरकारकडून ‘आनंदाचा शिधा’ वाटप करण्यात आला होता. मात्र, २०२४ मध्ये झालेल्या वाटपानंतर आता जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटला असून, यंदा ऑगस्टमध्ये अपेक्षित असलेला आनंदाचा शिधा अद्याप नागरिकांपर्यंत पोहोचलेला नाही. यावरून ऑल इंडिया पँथर सेनेचे अध्यक्ष दिपक केदार यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
“दोन वर्षांपूर्वी गणेशोत्सवाच्या काळात आनंदाचा शिधा मिळाला होता. आता तो कुठे गायब झाला?” असा सवाल केदार यांनी उपस्थित केला. दिवाळीचा सण जवळ येत असताना साखरेचे दर वाढत आहेत, मात्र गरजू कुटुंबांना दिलासा देणारा शिधा उपलब्ध होत नसल्याची टीकाही त्यांनी केली.
निवडणुकीच्या काळात विविध योजनांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित केले जाते. मात्र, निवडणूक संपल्यानंतर त्याच योजनांच्या लाभार्थ्यांवर पात्रता-अपात्रतेचे निकष लावले जात असल्याचा आरोप केदार यांनी केला. ‘लाडकी बहीण’ योजनेचाही संदर्भ देत त्यांनी सरकारच्या धोरणांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“निवडणूक जवळ आली की हिंदुत्व आणि हिंदूंचे सण यांचा मुद्दा पुढे केला जातो. सणांच्या पार्श्वभूमीवर योजनांच्या घोषणा होतात; मात्र निवडणूक संपल्यानंतर सणासुदीच्या काळातच साखर महाग होते आणि आनंदाचा शिधा गायब होतो,” अशी टीका केदार यांनी केली.
हिंदूंच्या श्रद्धा आणि सणांचा राजकीय फायद्यासाठी वापर केला जातो का, असा थेट सवालही त्यांनी सरकारला केला आहे. राज्यातील ‘ट्रिपल इंजिन’ सरकारने आनंदाचा शिधा योजनेबाबत जनतेला स्पष्ट उत्तर द्यावे, अशी मागणी केदार यांनी केली.
“हेच का तुमचे हिंदुत्वाचे सरकार?” असा सवाल करत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, “हरवलेला आनंदाचा शिधा सापडला तर जनतेला कळवा,” असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.